जगातील टॉप-5 ऑलराऊंडर खेळाडू, ज्यांनी कसोटीत 5,000 पेक्षा जास्त धावा आणि 200 पेक्षा जास्त विकेट्स घेतले! पाहा यादी

Published on -

कसोटी क्रिकेटमध्ये एकाच वेळी फलंदाज आणि गोलंदाज म्हणून मोठा ठसा उमटवणं ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. पण काही दिग्गजांनी हेही सहज शक्य करून दाखवले. कसोटीत 5,000 पेक्षा जास्त धावा आणि 200 पेक्षा जास्त विकेट्स घेणे म्हणजे खऱ्या अर्थाने अष्टपैलू खेळाडू ठरणे. आज आपण अशाच 5 महान खेळाडूंची यादी पाहणार आहोत, ज्यात भारताच्या एका महान दिग्गजाचाही समावेश आहे.

इयान बोथम (इंग्लंड)

इंग्लंडचा माजी अष्टपैलू इयान बोथम या यादीत तळाच्या क्रमांकावर असला तरी त्याची कामगिरी अफाट आहे. त्याने 102 कसोटी सामन्यांत 33.54 च्या सरासरीने 5,200 धावा केल्या. गोलंदाजीतही त्याचा तोडीस तोड वाटा होता. त्याने 28.40 च्या सरासरीने 383 विकेट्स घेतल्या, त्यात 27 वेळा पाच बळींचा पराक्रम केला.

कपिल देव (भारत)

या यादीत भारताचा एकमेव खेळाडू म्हणजे कपिल देव. भारताला 1983 मध्ये पहिला विश्वचषक मिळवून देणाऱ्या या अष्टपैलूने 131 कसोटी सामन्यांमध्ये 31.05 च्या सरासरीने 5,248 धावा केल्या. त्यात 8 शतके आणि 27 अर्धशतके होती. गोलंदाजीत त्याने 29.64 च्या सरासरीने 434 विकेट्स घेतल्या, त्यात 23 वेळा पाच विकेट्स घेतल्या आहेत.

बेन स्टोक्स (इंग्लंड)

सध्या इंग्लंडचा कर्णधार असलेला बेन स्टोक्सही या यादीत सामील झाला आहे. त्याने आजवर 115 कसोटी सामने खेळत 35.69 च्या सरासरीने 7,032 धावा केल्या आहेत. त्यात 14 शतकेही आहेत. गोलंदाजीत त्याने आतापर्यंत 230 विकेट्स घेतल्या आहेत, त्यात 5 वेळा पाच बळी मिळवले आहेत.

गॅरी सोबर्स (वेस्ट इंडिज)

क्रिकेट इतिहासातील सर्वकालीन महान अष्टपैलूंपैकी एक गॅरी सोबर्स तब्बल 20 वर्षे कसोटी क्रिकेटमध्ये खेळला. त्याने 93 कसोटीत 57.78 च्या सरासरीने 8,032 धावा केल्या, त्यात 26 शतके होती. गोलंदाजीतही त्याने 235 विकेट्स घेतल्या, आणि 6 वेळा पाच विकेट्सही घेतल्या.

जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका)

जगातील सर्वश्रेष्ठ अष्टपैलू खेळाडूंमध्ये गणना होणारा जॅक कॅलिसची कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. त्याने 166 कसोटी सामन्यांत 55.37 च्या सरासरीने 13,289 धावा केल्या आहेत. त्यात 45 शतके आहेत. गोलंदाजीत कॅलिसने 32.65 च्या सरासरीने 292 विकेट्स घेतल्या असून 5 वेळा पाच विकेट्स घेतल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!