Maharashtra New Expressway : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ राज्यात आणखी एका नव्या महामार्गाची निर्मिती करणार आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्य रस्ते विकास महामंडळाने विकसित केलेल्या समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाले.
दुसरीकडे समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर विकसित केल्या जाणाऱ्या नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला देखील सरकारने चालना दिली आहे. अशातच आता राज्यातील कोंकण विभागातील पालघर जिल्ह्यात निर्माणाधिन वाढवण पोर्ट मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाला इगतपुरीमधील भरवीर येथे जोडले जाणार आहे.

वाढवण पोर्ट ते भरवीर दरम्यान 104 किलोमीटर लांबीचा प्रवेश नियंत्रित महामार्ग तयार केला जाणार असून भरवीर येथे हा मार्ग समृद्धी महामार्ग सोबत जोडला जाईल.
नव्या 104 किलोमीटर लांबीच्या महामार्ग प्रकल्पाची सद्यस्थिती काय?
सध्या हा नवा 104 किलोमीटर लांबीचा महामार्ग प्रकल्प अगदीच सुरुवातीच्या टप्प्यात आहे. या प्रकल्पाचे अलाइनमेंट म्हणजेच संरेखन राज्य सरकारच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहे. पण या प्रस्तावाला लवकरच राज्य सरकारकडून मंजुरी मिळेल अशी आशा आहे.
दरम्यान या प्रस्तावाला सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर या प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादनाची कार्यवाही सुरू करण्यात येईल अशी माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे. आता आपण या प्रस्तावित महामार्गाचा रूट कसा असेल याबाबत माहिती पाहुयात.
प्रस्तावित महामार्गाचा रूट कसा असणार?
या प्रस्तावित प्रवेश नियंत्रित महामार्गाच्या रुतबाबत बोलायचं झालं तर याची सुरुवात इगतपुरीजवळील भरवीर खुर्द येथे होणार आहे आणि हा ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे थेट चारोटी जवळील तावा गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग 48 ला जोडण्यात येणार अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून समोर आली आहे.
त्यापुढे मग हा मार्ग वाढवण बंदराला जोडला जाणार आहे. त्यापुढील मार्गाचे काम नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाकडून करण्यात येईल अशी सुद्धा माहिती देण्यात आली आहे.
या महामार्गामुळे उत्तर महाराष्ट्रसहित मध्य महाराष्ट्रातील औद्योगिक व व्यापारी वस्तूंची वाहतूक थेट पश्चिम किनाऱ्याच्या वाढवण डीप-सी पोर्टपर्यंत अत्यंत सुलभ आणि जलद होणार असा आशावाद व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे मध्य महाराष्ट्रातील कृषी आणि औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे.
सर्व प्रकारच्या मालवाहतुकीसाठी हा मार्ग सोयीचा ठरणार आहे कारण की मुंबईच्या वाहतूककोंडीला टाळून हा मार्ग थेट मालवाहतुकीसाठी खुला होणार असे जाणकारांचे म्हणणे आहे. या नव्या प्रकल्पामुळे इगतपुरी ते वाढवण बंदर या दरम्यानचा प्रवास अवघ्या सव्वा तासांमध्ये पूर्ण होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.