तिसगाव- लाभधारक शेतकऱ्यांनी मागणी करताच युवानेते अक्षय कर्डिले यांच्या हस्ते वांबोरी चारीसाठी मुळा धरणातून ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात आले, त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मात्र, या योजनेचे पाणी सातवड, घाटशिरस, तिसगावसह, मढीपर्यंतच्या तलावात पोहोचण्यास अनेक अडथळे येतात.
मागील पाच वर्षांत या योजनेचे पाणी अनेक तलावापर्यंत पोहोचलेच नाही, त्यामुळे ना. राधाकृष्ण विखे पाटील व मुळा पाटबंधारे विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या पुढाकारातून लाभधारक शेतकऱ्यांसोबत लवकरच बैठक आयोजित केली जाणार असल्याची माहिती ज्येष्ठनेते काशिनाथ पाटील लवांडे व माजी सभापती संभाजीराव पालवे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

वांबोरी चारी टप्पा एकसाठी यापूर्वी अनेक वेळा मुळा धरणातून पाणी सोडण्यात आले. मात्र, सातवड, तिसगाव, घाटशिरस, मढीपर्यंत पाणी पोहोचण्यास अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो, त्यामुळे वांबोरी चारीच्या पाण्याबाबत वरील गावांतील शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येते. वांबोरी चारीचे पाणी शेवटच्या लाभधारक तलावापर्यंत पूर्णदाबाने पोहोचावे, यासाठी आ. शिवाजीराव कर्डिले यांनी विशेष प्रयत्न करून पंधरा दिवसांपूर्वीच सुमारे १४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
या निधीतू पाईपलाईन दुरुस्ती तसेच इतर अनेक तांत्रिक अडथळे दूर करून टेलच्या गावापर्यंत पाणी देण्याच्या दृष्टीने मुळा पाटबंधारे विभागाला सूचना करण्यात आल्या आहेत. मिरी, सातवड, घाटशिरस, तिसगाव, शिरापूर, मढी या भागात पाणी पोहोचण्यास अडथळे येत आहेत, त्यामुळे या भागातील लाभधारक शेतकऱ्यांची ना. विखे पाटील अथवा माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, युवानेते अक्षय कर्डिले यांच्या प्रमुख उपस्थितीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली जाणार आहे. बैठकीत वरील गावांपर्यंत पाणी पोहचण्यास येणाऱ्या अडथळ्यांवर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत चर्चा होणार आहे.
वांबोरी चारीसाठीच्या मुख्य मागण्या
मुळा धरणातील वांबोरी चारीचा फुटबॉल आणखी खोल घालावा. तिसगाव, मढीपर्यंत पाणीपूर्ण दाबाने जाण्यासाठी सातवड, घाटशिरस जवळ बुस्टर पंप बसवावा, मिरी लाईनला पूर्णदाबाने पाणीपुरवठा होण्यासाठी तांत्रिक अडथळे दूर करावेत, या प्रमुख मागण्या असल्याचे माजी सभापती काशिनाथ पाटील लवांडे, संभाजीराव पालवे, ज्येष्ठनेते अरुण पाटील आठरे व गणेश पालवे यांनी म्हटले आहे.