पाथर्डी- शहरातील जुन्या बसस्थानकावर चोऱ्यांचे वाढते प्रकार लक्षात घेता पोलिसांनी आगारप्रमुखांना नोटीस बजावली असून, लवकरात लवकर सीसीटीव्ही कॅमेरे न बसविल्यास गुन्हेगारांना प्रोत्साहन दिल्याच्या आरोपावरून संबंधित जबाबदार अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी पाथर्डी आगाराला दिला आहे.
या पत्रामुळे आगारातील सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
दि.२४ जुलै व ३० जुलै रोजी दागिने चोरण्याचे गंभीर प्रकार येथे घडले आहेत. दोन्ही मिळून सुमारे साडेसहा तोळे दागिन्यांची चोरी झाली. त्यासंबंधी फिर्याद पाथर्डी पोलीस स्टेशनला दाखल आहे. याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून आगार व्यवस्थापकांना पोलिसांकडून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत तोंडी व लेखी सूचना देण्यात आल्या आहेत.

पाथर्डी आगाराकडून याबाबत कोणतीही गंभीर दखल घेतली जात नाही. जुन्या बस स्थानकावर तर अवैध प्रवासी वाहतूकदारांचा मोठा अड्डा असून, तेथे सुरक्षारक्षक सुद्धा नाही, त्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. चालक वाहक काही गुन्हेगारांना ओळखतात, पण सर्वच स्थानिक असल्याने कुणी कुणाविरुद्ध बोलत नाही. श्रावण महिन्यानिमित्त तालुक्यातील मढी, मोहटादेवी, वृद्धेश्वर, हनुमान टाकळी, भगवानगड अशा विविध ठिकाणी भाविकांची गर्दी वाढली असून, अनेक भाविक एसटी बसने प्रवास करतात. त्यातच मुंबई, कोकण, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातून भगवानगड येथे रात्रीच्या मुक्कामासाठी सुमारे ३० बस गाड्या असतात.
सर्व प्रवासी वाहतूक पाथर्डीच्या जुन्या बस स्थानकावरून अधिक प्रमाणात चालते. पाळत ठेवून दागिने, चोरणे, खिसे कापणे, बेगा उचलणे असे प्रकार सुरू आहेत. दोन्ही बसस्थानकावर पोलिसांचीसुद्धा नियुक्ती आहे, पण वाढीव बंदोबस्त व अपुरी संख्या असे कारण सांगत पोलीस अभावानेच बसस्थानकावर आढळतात. काल दुपारी पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी आगाराला भेट देऊन पाहणी केली. जबाबदार अधिकारी तेथे नसल्याने उपस्थित कर्मचाऱ्यांना तोंडी सूचना देत आगारप्रमुखांच्या नावाने नोटीस बजावली आहे.
त्यामध्ये वारंवार सांगूनही आपल्याकडून सीसीटीव्ही बसवण्याची कार्यवाही होत नसल्याने आपण गुन्हेगारांना प्रोत्साहन देत आहात, असे निष्पन्न होते असे पत्रात म्हटले आहे. लवकरात लवकर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून पूर्तता अहवाल न दिल्यास प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी एसटीच्या आगारप्रमुखांना दिला आहे.
जुन्या स्टँडवरील शेडचे नूतनीकरण करण्याचे मान्य करूनही ती न झाल्याने एकाच मोठ्या शेडमध्ये प्रवाशांची गर्दी होते. गाडी आल्यानंतर दाराजवळ होणारी गर्दी व तीनही प्रवेशद्वारांच्या बाजूला अतिक्रमणात असलेल्या टपऱ्यांपुढे पार्किंग केलेल्या गाड्यांमुळे एसटीला वळणसुद्धा घेता येत नाही. अशा गोष्टीचा गैरफायदा घेत गुन्हेगार चालया बसमधून माल लंपास करून गेट पुढे गाडी थांबते, त्याचवेळी पुन्हा उतरून निघून जातात. पालिका व पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांसमवेत विशेष मोहीम हाती घेत तीनही प्रवेशद्वारांच्या बाजूची एसटीला येता जाता येईल, एवढ्या पद्धतीची अतिक्रमणे काढली तरी गुन्हेगारीला आळा बसू शकेल. मात्र, तसे होण्याऐवजी पोलिसांनी चेंडू आगारप्रमुखांकडे टोलावला, तर एसटीकडून पोलीस येथे थांबत नाहीत, असे सांगत तो चेंडू पुन्हा पोलिसांकडे परतविला जातो. या वादात मात्र निरपराध प्रवासी नागवला जातो.