आपल्या दिवसाची सुरुवात कशी होते, यावर संपूर्ण दिवसाची दिशा अवलंबून असते. सकाळी उठून पहिली गोष्ट जी आपण आपल्या शरीरात टाकतो, ती फक्त पोटच नाही तर आरोग्याचंही भविष्य ठरवते. पण हल्ली आपण सर्वांनीच एक सवय अंगीकारली आहे, रिकाम्या पोटी चहा पिण्याची. सकाळचा दुधाचा चहा कितीही सवयीचा वाटत असला, तरी तो आपल्या पचनसंस्थेसाठी काहीसा कठीण ठरतो, आणि अनेकदा अॅसिडिटी, गॅस, आणि थकवा यामागचं मुख्य कारणही ठरतो.

म्हणूनच, शरीराला खरं तर सकाळीच अशा गोष्टींची गरज असते ज्या पोषण देतात, पचन सुधारतात आणि आपल्या रोगप्रतिकारक शक्तीला चालना देतात. आपण जर सकाळचा पहिला आहार विचारपूर्वक ठरवला, तर त्याचे परिणाम आपल्या संपूर्ण आरोग्यावर सकारात्मक होतात.
ड्राय फ्रूटस
उदाहरणार्थ, रात्री भिजवलेले काळे मनुके सकाळी खाल्ल्यास शरीराला लोह मिळतं, थकवा दूर होतो आणि त्वचाही उजळते. पोटही स्वच्छ राहतं, जे चांगल्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, 2-3 भिजवलेले बदाम किंवा अक्रोड मेंदूला ऊर्जित ठेवतात, पचन सुधारतात आणि त्वचेला ताजेपणा देतात.
कच्चा लसूण आणि मध
कच्चा लसूण आणि त्याबरोबर मध घेतल्यास शरीरातील सूज कमी होते, यकृत स्वच्छ राहतं आणि कोलेस्टेरॉल व रक्तदाब नियंत्रित राहतो. हिंग आणि कढीपत्त्याचे मिश्रण ताकात टाकून प्यायल्याने तर पचनसंस्था मजबूत होते आणि वारंवार होणारी अॅसिडिटी दूर राहते.
जिरे आणि दालचिनीचं पाणी
जिरे आणि दालचिनीचं कोमट पाणी हेही एक प्रभावी नैसर्गिक पेय आहे. हार्मोनल असंतुलन, मधुमेह किंवा पाळीच्या तक्रारी असलेल्या महिलांसाठी हे विशेष उपयोगी ठरतं. चयापचय सुधारण्याबरोबरच लठ्ठपणाही नियंत्रणात ठेवण्यास मदत करतं.
सब्जा बिया
उन्हाळ्याच्या दिवसात नारळाच्या पाण्यात थोड्या सब्जा बिया टाकून प्यायल्यास शरीराला थंडावा मिळतो, नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्सची पूर्तता होते आणि दिवसभर थकवा जाणवत नाही. त्याचप्रमाणे, भिजवलेले अंजीर किंवा मनुके सकाळी खाल्ल्यास बद्धकोष्ठता दूर राहते आणि त्वचाही निरोगी दिसते.