साकुरी- शिर्डी लगत असलेल्या निमगाव कोऱ्हाळे येथील श्रद्धा सबुरी पतसंस्थेत ४१ कोटी ९७ लाख १७ हजार ४० रुपयांचा अपहार व गैरव्यवहार केला म्हणून २७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्याचा तपास गुन्हा अन्वेषण विभाग अहिल्यानगर यांच्याकडे वर्ग करण्यात आला असून नुकतेच पतसंस्थेचे संचालक मंडळ बरखास्त करून राहाताचे सहाय्यक निबंधक नामदेव ठोबळ यांनी
त्रिसदस्यीय समितीची नियुक्ती केली आहे. त्यात सहकार अधिकारी संजय पाटील, लेखापरीक्षक ए. एस. पटेल व व्हि. जे. औताडे यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सहकार विभागाच्या सूत्रांनी दिली.

ही त्रिस्तरीय समिती कलम ८८ अन्वये चौकशीसाठी कागदपत्र उपलब्ध करून देणे, संस्थेचे दैनंदिन कामकाज बघणे तसेच कर्ज वसुलीबाबत कठोरपणे पाठपुरावा करणे, अशी विविध कामे बघणार आहे. तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ८८ अन्वये संस्थेत झालेल्या गैरव्यवहाराची जबाबदारी निश्चित करण्यासाठी नेवासा येथील सहाय्यक निबंधक देवीदास घोडेचोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संस्थेचे विद्यमान ११ संचालक व मॅनेजरसह आठ कामगार व मागील पंचवार्षिक मधील आठ संचालक, अशा २७ जणांवर यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संस्थेच्या कागदपत्रात ३१ मार्च २०२४ अखेर ५३ कोटी ८ लाख २० हजार ३५७ रुपयांच्या ठेवी व ६३ कोटी ५८ लाख ७० हजार ६३८ रुपये कर्ज वितरण केलेले दिसत असले तरी बँकेच्या खात्यावर मात्र कुठलीच रक्कम दिसून येत नाही. त्यामुळे कर्ज वसुलीचे मोठे आव्हान आहे.
सहकार खात्याने तत्पर कारवाई सुरू केल्यामुळे ठेवीदारांत समाधानाचे वातावरण पसरले आहे. गैरव्यवहार प्रकरणी यापूर्वीच पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र गाडेकर, व्हा. चेअरमन बाळासाहेब गाडेकर व व्यवस्थापक अनिल खैरे यांना शिर्डी पोलिसांनी गजाआड केले आहे.