पुणतांबा- पुणतांबा गावातील अंतर्गत रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. यासंदर्भात पूर्वी ग्रामपंचायतीला मनसेच्या वतीने व अमृतेश्वर महिला मंच यांच्यावतीने अनेकदा निवेदने देण्यात आली. परंतु त्या निवेदनांना ग्रामपंचायतीने केराची टोपली दाखवली. अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती करावी अन्यथा ग्रा.पं. ला टाळे ठोकू, असा इशारा माजी उपसरपंच संदीप धनवटे यांनी दिला आहे.
चिखलमय झालेल्या रस्त्यांमुळे दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे तातडीने गावातील अंतर्गत रस्ते चांगल्या पद्धतीने दुरुस्त करावेत, असा आक्रमक पवित्रा अमृतेश्वर महिला मंडळाच्यावतीने घेत ग्रामपंचायत कार्यालयात अधिकाऱ्यांना नुकताच घेराव घालण्यात आला.

माजी उपसरपंच संदीप धनवटे यांनी चिखलमय झालेल्या रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण करून गांधीगिरी केली. जर दोन दिवसांत अंतर्गत रस्त्याची दुरुस्ती झाली नाही तर ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे असा ठोकण्यात येईल, इशारा धनवटे यांनी दिला आहे. मात्र, पुणतांबा गावातील दुर्दशा झालेल्या अंतर्गत सर्व रस्त्यांचा विचार करता ग्रामपंचायती जवळ रस्त्याचे काम करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध नसल्याचे ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब महाजन यांनी सांगितले.
ग्रामविस्तार अधिकारी एस. जी. माळी यांना पाचारण करण्यात आले असता, त्यांनी संतप्त महिलांच्या समस्या ऐकून घेत ग्रामविकास अधिकारी यांच्याबरोबर चर्चा केली. गावातील अंतर्गत रस्ते दुरुस्तीसाठीच्या खर्चाचा अंदाज घेतला. परंतु हा खर्च करण्याइतकी रक्कम ग्रामपंचायतीकडे उपलब्ध नसल्याचे ग्रामविकास अधिकारी महाजन यांनी माळी यांना सांगितले.
यावेळी माजी उपसरपंच संदीप धनवटे, विकास जोगदंड, गोविंद बोरबने, निलेश दुरगुडे, राजेंद्र धनवटे, मयूर विश्वासराव, गणेश विश्वासराव, दीपक धनवटे, सतीश सांबारे, पंकज खुळगे, राहुल जोशी, प्रकाश देशमाने, मनोज देशमाने, अर्जुन फल्ले, जनार्दन फल्ले, दीपक काळे, अतुल काळे, सार्थक गोहे, गणेश देशमाने, नितीन कोळेकर, प्रसाद जंगले यांनी गांधीगिरी करत रस्त्यावर साचलेल्या खड्ड्यातील पाण्यामध्ये वृक्षारोपण केले.