संगमनेर- भाजपचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ गुंजाळ यांनी सामान्य जनता, शेतकरी, कामगार आणि कष्टकरी वर्गासाठी सातत्याने लढा दिला. त्यांच्या या कार्याची दखल भाजपने घेऊन त्यांना राज्य परिषदेवर संधी देत त्यांचा पक्षाने खऱ्या अर्थाने सन्मान केल्याचे गौरवोद्गार आमदार अमोल खताळ यांनी काढले.
तालुक्यातील कोल्हेवाडी येथील भाजप ज्येष्ठ नेते दादाभाऊ गुंजाळ यांची भारतीय जनता पार्टी राज्य परिषद सदस्यपदी नुकतीच निवड झाली. त्यानिमित्ताने कोल्हेवाडी ग्रामस्थांच्या वतीने आ. अमोल खताळ यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते बी. आर. वामन होते. यावेळी व्यासपीठावर भाजप ज्येष्ठ नेते वसंत गुंजाळ, वसंतराव देशमुख, अॅड. सदाशिव थोरात, बापुसाहेब गुळवे, कोल्हेवाडीच्या सरपंच सुवर्णा दिघे, भास्कराव दिघे, प्रवरा पत संस्थेचे चेअरमन राहुल दिघे, मोहन वामन, नानासाहेब खुळे, सतीश वाळुंज, अमोल दिघे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
जुने-नवे नेते एकत्र घेऊन या तालुक्याचा सर्वांगिण विकास करायचा आहे. दादाभाऊंसारख्या कार्यकर्त्यांनी ज्या निष्ठेने काम केले, तेच आपल्याला पुढे घेऊन जायचे असल्याचे आ. खताळ यांनी सांगितले. वाळुंज यांनी सूत्रसंचालन केले. भास्करराव दिघे, प्रवरा पतसंस्थेचे चेअरमन राहुल दिघे यांनी प्रास्ताविक केले. तर मोहन वामन यांनी आभार मानले.
सर्वसामान्य जनतेच्या मदतीला धावून जाणारा दादा आहे. त्यांनी कोल्हेवाडी गावासाठी अनेक खस्ता खाल्ल्या आहेत म्हणूनच त्यांचा भाजपाने राज्य परिषदेवर सदस्यपदी निवड करून सन्मान केल्याचे ज्येष्ठ नेते वसंतराव गुंजाळ यांनी स्पष्ट केले. तर एस. झेड. देशमुख यांनी सांगितले, दादाभाऊ आणि अमोलभाऊ ही जोडी संगमनेरच्या विकासासाठी आदर्श आहे. त्यांच्या कार्यामुळे संगमनेरमध्ये खऱ्या अर्थाने परिवर्तन घडले आहे. पूर्वी यांना कोणीच आठवत नव्हते, परंतु आमदार अमोल खताळ यांच्या रूपाने परिवर्तन झाले.
पुढील काही महिन्यांत जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणूका होणार आहेत. या निवडणूकांच्या हेराफेरी होण्याची दाट शक्यता आहे. त्यावर बारीक लक्ष ठेवा आणि या सर्व निवडणूकीत महायुतीचा भगवा फडकवि ण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन ज्येष्ठ नेते वसंत देशमुख यांनी स्पष्ट केले.