राहुरी- आमचे वाळूचे पैसे द्या, असे म्हणून आरोपींनी पती-पत्नीला शिवीगाळ करुन लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच घरात घुसून घरातील एक लाख रुपये व पत्नीच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण तोडून नेल्याची घटना रविवारी रात्रीच्या सुमारास राहुरी तालुक्यातील पाथरे खुर्द येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जनाबाई किरण चव्हाण (वय ३८) यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, माझे पती किरण चव्हाण यांच्याशी वाद झाले आहेत. त्यामुळे मी श्रीरामपूर तालुक्यातील मालुंजे येथील अच्युत गोपिनाथ साळे यांच्यासह पाथरे खुर्द येथे राहावयास आहे. त्यांच्या नविन घराचे बांधकाम चालू असून बांधकामाकरिता लागणारी वाळू अण्णा औटी याच्याकडून घेत असतात. रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास मी, माझे पती अच्युत गोपिनाथ साळे व मुलगा मेघराज असे तिघेजण घरी असताना तेथे आरोपी आले.

मी तुमच्या इथे वाळू टाकली आहे, त्याचे पैसे द्या, अशी मागणी त्यांनी केली. त्यावेळी मी व पती अच्युत त्यांना म्हणालो की, आम्ही तुमचे पैसे दिलेले आहेत. आमच्याकडे तुमचे पैसे शिल्लक राहिलेले नाहीत, असे म्हणाल्याचा त्यांना राग आल्याने आरोपींनी आम्हाला शिवीगाळ, दमदाटी करुन लाथाबुक्क्याने मारहाण केली.
तसेच तुम्ही पैसै कसे काय देत नाही, तेच पाहतो, अशी धमकी देत घरात घुसून टेबलच्या ड्रावरमध्ये ठेवलेले एक लाख रुपये तसेच माझ्या गळ्यातील दोन तोळ्यांचे सोन्याचे गंठण तोडून घेतले. त्यानंतर शिवीगाळ, दमदाटी करत पती अच्युत साळे, मुलगा मेघराज चव्हाण यांना ‘तुम्ही दोघे आम्हाला नदीच्या पुलावर भेटा. तुम्हाला दोघाला जिवे ठार मारुन टाकतो, अशी जिवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी जनाबाई किरण चव्हाण यांच्या फिर्यादीवरून आरोपी आण्णा भागवत औटी व गिताराम कर्णा घारकर (दोघे रा. पाथरे खुर्द, ता. राहुरी) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.