शिर्डी- सध्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर वाढता किड व रोगांचा प्रादुर्भाव मोठे आव्हान ठरत आहे. उत्पादनात घट होण्याचा धोका लक्षात घेता, कृषि तज्ज्ञांनी वेळेवर नियंत्रण उपाययोजना राबविण्याचे आवाहन केले आहे.
याबाबत पत्रकात म्हटले, की सध्या ऊस पिकांवर पांढरी माशी किडीचा आणि तपकिरी ठिपके बुरशीजन्य रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव दिसून येत आहे. पांढरी माशी ही कीड उसाच्या पानांच्या मागील बाजूने, शिरेजवळ अंडी घालते.

त्यातून बाहेर पडलेली पिल्ले कोवळ्या पानांमधून रस शोषतात. अशा पानांवर दिसणारे काळपट ठिपके म्हणजे या किडीचे कोष असतात. या कोषातून बाहेर पडलेली प्रौढ माशीही पानांमधून मोठ्या प्रमाणावर रस शोषते. त्यामुळे पानांवर सुरुवातीला पिवळसर झाक येते आणि पुढे पाने कोरडी होऊन वाळतात. परिणामी, उसाची वाढ खुंटते, ऊस कमकुवत होतो आणि उत्पादनात लक्षणीय घट होते.
या पार्श्वभूमीवर पायरेन्स लोणी संचलित कृषि विज्ञान केंद्र बाभळेश्वरच्या पिकसंरक्षण विभागाचे भरत दंवगे यांनी शेतकऱ्यांना वेळीच योग्य उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. उसाच्या पानांवर दिसणारा तपकिरी ठिपका हा बुरशीजन्य रोग असून, पावसाळ्यात हवेमार्फत त्याचा प्रसार होतो. दमट आणि ढगाळ हवामान असताना ही बुरशी पानांवर वाढते. त्यामुळे पानांवर लालसर तपकिरी ठिपके पडतात. परिणामी, पाने वाळतात आणि ऊस उत्पादनात घट होते.
या दोन्ही समस्यांवर नियंत्रणासाठी फवारणीचे मार्गदर्शन देण्यात आले आहे. पारंपरिक पद्धतीने फवारणी करताना २०० लिटर पाण्यात ७० ग्रॅम क्लोथियानिडीन किंवा २०० ग्रॅम असिटामीप्रिड यासोबत ५०० ग्रॅम झायनेब मिसळून एकत्रित फवारणी करावी. ड्रोनद्वारे फवारणी करताना प्रति एकर २०० मिली स्पिरोटेट्रामॅट हे कीटकनाशक, २०० मिली अझॉक्सिस्ट्रॉबीन व डायफेनोकोनाझोल मिश्र बुरशीनाशक मिसळून फवारणी करावी. अधिक माहितीसाठी कृषि विज्ञान केंद्र, बाभळेश्वर येथे संपर्क साधावा, असेही भरत दंवगे यांनी सांगितले आहे.