कोपरगाव- अज्ञात चोरट्यांनी चक्क उजनी उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक एकच्या ट्रान्सफॉर्मर मधील ऑईल आणि तांब्याच्या कॉईलची चोरी केली. या प्रकरणी पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर शिर्डी पोलिसांनी अज्ञात चोराविरोधात नुकताच गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी चक्क उजनी उपसा योजना टप्पा क्रमांक एकच्या विद्युत मंडळाच्या कार्यरत उजनी उपसा सिंचन योजनेसाठी गोदावरी उजव्या कालव्यातून १५० एचपी पंपाद्वारे पाणी लिप्ट करुन धोंडेवाडी पाझर तलाव येथे सोडण्यात येते. त्यासाठी तालुक्यातील शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शहापूर येथील ३१५ केव्ही ट्रान्सफॉर्मर बसविले असून येथूनच उजनी उपसा सिंचन योजना टप्पा एकला विजेचा पुरवठा होतो.

गोदावरी कालव्याला ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे मंगळवारी (दि. २९) सदर योजनेचा पंप ऑपरेटर मच्छिद्र शिरोळे व उजनी उपसा सिंचन योजनेचे अध्यक्ष बाबुराव थोरात वीज पंप चालू करण्यासाठी गेले असता, सदर वीजपंप सुरु झाला नाही. वीजपुरवठा खंडित झाल्याने शिरोळे आणि थोरात यांनी ट्रान्सफॉर्मरकडे धाव घेऊन पाहणी केली असता, ट्रान्सफॉर्मर मधील ऑईल व तांब्याची कॉईल चोरी गेल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी ही बाब पाटबंधारे कनिष्ठ अभियंता अनिल प्रभाकर थोटे या अधिकाऱ्यांना सांगितली.
त्यांनी याबाबत वरिष्ठांना माहिती देऊन शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याची माहिती कळताच आ. काळे यांनी पोलिसांना तातडीने तपास करण्याच्या सूचना दिल्या. यापूर्वीही असे प्रकार ग्रामीण भागात घडले आहे. अज्ञात चोराट्यांविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक चौकशी करीत आहे.
पाणी मिळण्यास विलंब होणार
रांजणगाव देशमुख, जवळके, धोंडेवाडी, वेस, सोयगाव, अंजनापूर, बहादरपूर, मनेगाव या कायमस्वरूपी दुष्काळी गावासाठी ही योजना चालू राहावी, यासाठी आ. आशुतोष काळे २०१९ पासून स्वतःच्या खिशातून दरवर्षी वीज बिलासह देखभाल दुरुस्तीचा खर्च करीत आहे. या चोरीमुळे येथील शेतकऱ्यांना पाणी मिळण्यास विलंब होणार असल्याने तातडीने पोलिसांनी तपास लावावा, अशी मागणी अध्यक्ष बाबुराव थोरात यांनी केली आहे.