करंजी- पाथर्डी तालुक्यातील मिरी बसस्थानकाची मोठी दुरवस्था झाली असून, बसस्थानकाजवळच कचऱ्याचे मोठमोठे ढिगारे साचले आहेत. एवढेच नव्हे तर बस स्थानकाच्या छतावरील पत्रेदेखील गायब झाले असून, प्रवाशांना उभे राहण्यापूर्तीदेखील जागा या ठिकाणी उपलब्ध नसल्याने प्रवाशांना अक्षरशः रस्त्यावर उभे राहून एसटी बसची वाट पहावी लागत आहे.
मिरी मार्गे पाथर्डी, शेवगाव, नगर, नेवासा, तालुक्याकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे, त्यामुळे मिरी येथे थांबणाऱ्या प्रवाशांची संख्यादेखील मोठी असते. मिरी येथील बसस्थानकाची वेळीच दुरुस्ती करून त्या ठिकाणी प्रवाशांच्या उठबसची व्यवस्था झाली नाही तर या बस स्थानकाची हक्काची जागा अतिक्रमणधारकांकडून गिळंकृत झाल्याशिवाय राहणार नाही.

अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी हा बसथांबा असून, या ठिकाणी प्रवाशांची वर्दळ लक्षात घेता बसस्थानकाची तत्काळ दुरुस्ती करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. एस टी महामंडळ अथवा आमदार-खासदार या लोकप्रतिनिधींनी या प्रश्नात लक्ष घालून बसस्थानकाची दुरुस्ती करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.