अखेर ‘सिस्पे कंपनी’च्या संचालक मंडळावर सुपा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ; जादा परताव्याच्या आमिषाने ४५० कोटींची फसवणूक

Published on -

‘सिस्पे कंपनी’, ट्रेडज इन्व्हेस्टमेंट प्रा.लि. या कथित फायनान्स कंपन्यांनी पारनेर तालुक्यातील २१ हजार ३६१ गुंतवणूकदारांची तब्बल ४५० कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अधिक परताव्याचं आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली असून या प्रकरणी १ ऑगस्ट रोजी पहाटे कंपनीच्या संचालक मंडळावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

या कंपनीवर काही दिवसांपूर्वी श्रीगोंदा आणि नगर शहरातील तोफखाना पोलिस ठाण्यातही गुन्हे दाखल झालेले आहेत याबाबत विनोद बबन गाडीलकर (वय ४४, रा. माळवाडी, वाघुंडे, ता. पारनेर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची २०२२ मध्ये नगरमधील एका कार्यक्रमात कंपनीचा मार्केटिंग डायरेक्टर नवनाथ जगन्नाथ अवताडे याच्याशी ओळख झाली होती.

त्यावेळी त्याने आमच्या कंपनीत गुंतवणूक केल्यास ज्यादा परतावा मिळेल अशी माहिती सांगितली. त्यानंतर त्याने फिर्यादी यांना एक दिवस पुण्यात बोलावून घेतले. तेथे त्याने कंपनीचा सीईओ अगस्त मिश्रा, संचालक राहुल काळोखे, गौरव सुखदेवे, प्रसाद कुलकर्णी, सचिन खडतरे, चेतन धर, ययाती मिश्रा यांची ओळख करून दिली. त्यानंतर या सर्वांनी ट्रेडज इन्व्हेस्टमेंट प्रा.लि. या कंपनीची सविस्तर माहिती सांगून गुंतवणुकीतून दरमहा १० ते १५ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविले.

त्यानंतर फिर्यादी सह पारनेर तालुक्यातील अनेकांना मोठमोठ्या पंचतारांकित हॉटेल मध्ये मिटिंग घेवून मोठ मोठे आमिष दाखविले. त्यामुळे फिर्यादीसह अनेकांनी या कंपनीत गुंतवणूक केली. त्यांना विश्वास बसावा म्हणून काही दिवस कसा बसा १० ते ११ टक्के परतावा दिला. त्यामुळे पारनेर तालुक्यातील सुमारे २१ हजार ३६१ गुंतवणूकदारांची तब्बल ४५० कोटी रुपयांची गुंतवणूक केली. त्यानंतर काही दिवसांनी कंपनीने परतावा देणे बंद केले.

सुपा व परिसरातील गुंतवणुकदारांचे प्रथम सिस्पे नंतर ट्रेडज इन्व्हेस्टमेंट, इन्फीनाईट बिकन मल्टीस्टेट या नावाची कंपन्या सुरु करून शेअर्समध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली व १० ते १२ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून कोट्यावधी रूपये जमा केले. या कंपनीकडूनही गुंतवणुकदारांचे काही दिवसांपासून पैसे परत मिळेनासे झाले आहेत. कंपनीचे काम सुरू आहे. कंपनीचे नाव बदलले आहे.

परकीय चलनात आपले शेअर्स बदलले जात आहेत, सॉफ्टवेअर दुरूस्ती सुरू आहे, अशी कारणे सांगत गुंतवणुकदारांना काही दिवस झुलवत ठेवले होते. मात्र नंतर काही दिवसांपूर्वी कंपनीचे कार्यालय बंद झाल्याने आता पैसे मिळणार नाहीत, अशी खात्री गुंतवणुकदारांची झाली. त्यांनी एजंटांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र एजंटांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यावर फिर्यादी सह अन्य गुंतवणूकदारांनी जिल्हा न्यायालयात तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत न्यायालयाने याबाबत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्या नंतर या कंपनीचे सीईओ अगस्त मिश्रा, संचालक राहुल काळोखे, गौरव सुखदेवे, प्रसाद कुलकर्णी, सचिन खडतरे, चेतन धर, ययाती मिश्रा मार्केटिंग डायरेक्टर नवनाथ जगन्नाथ अवताडे यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी या करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!