श्रीरामपूर येथील सुप्रसिद्ध चित्रपट गीतकार निसर्ग कवी बाबासाहेब सौदागर यांची कविता सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या अभ्यासक्रमा साठी निवडली गेली आहे. पुणे विद्यापीठाच्या बी.ए.प्रथम वर्षा करीता ही सातशे महाविद्यालयात शिकविली जाणार आहे. विद्यापीठ अभ्यासक्रम मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ.संदीप सांगळे यांनी ही माहिती दिली.
अभ्यासक्रम मंडळाचे सर्व संचालक आणि जेष्ठ विचारवंत समीक्षक प्रा. डॉ.सुधाकर शेलार यांनी हे पुस्तक संपादीत केले आहे. बाबासाहेब सौदागर यांनी शंभर पेक्षा जास्त चित्रपटा करीता गीत लेखन केले आहे. मध्यमवर्ग या चित्रपटातील ही देशभक्ती पर कविता भारतातील आजचे वास्तव दर्शविते. सुप्रसिध्द हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेते रवी किशन आणि इतर नामवंत कलाकार यांच्यावर ही कविता चित्रीत करण्यात आली आहे.

देशातील अराजकतेवर कवी सौदागर यांनी भाष्य केलेले आहे. या कवितेला हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध गायक रुपकुंवर राठोर आणि साधना सरगम यांनी गायिली आहे. निसर्ग कवी म्हणून ओळख असलेल्या बाबासाहेब सौदागर यांनी अनेक चित्रपटांसह लोकप्रिय मालिकेतील शिर्षक गीते लिहीली आहेत. आशा अभिलाषा, भंडारभुल, स्वराज्य रक्षक संभाजी, स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेतील त्यांची सर्व गाणी लोकप्रिय झालेली आहेत.
त्यांनी लिहीलेले सांजगंध,चित्ररंग,पिवळण,मृग पक्षी हे त्यांचे कवितासंग्रह तसेच पायपोळ हे आत्मचरित्र, भेद्रपान हे कलाक्षेत्रातील आत्मकथन लोकप्रिय झालेले आहे. अनेक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदे त्यांनी भूषविली आहेत.
माझ्या गाण्याची जन्मकथा हा त्यांचा लोकप्रिय चित्रपट गीत लेखावरील रुपेरी पडद्यावरील अनुभूतीचा कार्यक्रम सध्या लोकप्रिय आहे. अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले असून या वर्षी चित्रपट पारितोषिक परीक्षण समितीवर त्यांनी काम केलेले आहे. अहिल्यानगरच्या सांस्कृतिक क्षेत्रामधून त्यांचे अभिनंदन केले जाते आहे.