अहिल्यानगर : जिल्ह्यात शिर्डी, शेवगाव, श्रीगोंदा, तोफखाना पोलीस ठाण्यात शेअर मार्केट कंपन्यांवर फसवणुकीचे दाखल असताना आता सुपा पोलीस ठाण्यात ट्रेझर ईन्वेस्टमेंट प्रा. लि. या कंपनीच्या संचालकांविरोधात १ ऑगस्ट रोजी पहाटे गुन्हा दाखल झाला आहे. जादा परताव्याचे आमिष दाखवून २०२२ पासून आतापर्यंत सुमारे २१ हजार ३६१ गुंतवणूकदारांची ४५० कोटींची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले.
मॅनेजिंग डायरेक्टर तथा सीईओ अगस्त मिश्रा, संचालक राहुल काळोखे, गौरव सुखदेवे, प्रसाद कुलकर्णी, सचिन खडतरे, चेतन धर, ययाती मिश्रा, मार्केटिंग डायरेक्टर तथा सीईओ नवनाथ जगन्नाथ आवताडे सर्व रा. ३०१ सेलो प्लॅटिना, ललित महालसमोर एस.सी रोड पुणे अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत विनोद बबन गाडीलकर (वय ४४, रा. माळवाडी, वाघुंडे, ता. पारनेर) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीत म्हटले की, २०२२ मध्ये नगरमधील एका कार्यक्रमात कंपनीचा मार्केटिंग डायरेक्टर नवनाथ अवताडे याच्याशी ओळख झाली. त्यावेळी त्याने आमच्या कंपनीत गुंतवणूक केल्यास ज्यादा परतावा मिळेल अशी माहिती सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर आवताडे यांनी एक दिवस पुण्याला बोलावून घेतले. तेथे कंपनीचा सीईओ अगस्त मिश्रा, संचालकांची ओळख करून दिली.
त्यानंतर या सर्वांनी ट्रेडज इन्व्हेस्टमेंट प्रा. लि. या कंपनीची सविस्तर माहिती सांगून गुंतवणुकीतून दरमहा १० ते १५ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर माझ्यासह पारनेर तालुक्यातील अनेकांना मोठमोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये मिटिंग घेऊन मोठ मोठे आमिष दाखविले. त्यामुळे माझ्यासह अनेकांनी या कंपनीत गुंतवणूक केली.
त्यांना विश्वास बसावा म्हणून काही दिवस १० ते ११ टक्के परतावा दिला. त्यामुळे पारनेर तालुक्यातील सुमारे २१ हजार३६१ गुंतवणूकदारांची तब्बल ४५० कोटी रुपयांची गुंतवणूक केली. या कंपनीने काही दिवसांनी गुंतवणूकदारांना परतावा देणे बंद केले.
सुपा व परिसरातील गुंतवणुकदारांचे प्रथम सिस्पेनंतर ट्रेडज इन्व्हेस्टमेंट, इन्फीनाईट बिकन मल्टीस्टेट या नावाची कंपन्या सुरू करून शेअर्समध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली व १० ते १२ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून कोट्यावधी रुपये जमा केले. या कंपनीकडूनही गुंतवणुकदारांचे काही दिवसांपासून पैसे परत मिळेनासे झाले आहेत.
त्यांनी विविध कारणे सांगून गुंतवणुकदारांना काही दिवस झुलवत ठेवले. आता पैसे मिळणार नाहीत अशी खात्री झाल्यानंतर माझ्यासह अन्य गुंतवणूकदारांनी जिल्हा न्यायालयात तक्रार दाखल केली. न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी करीत आहेत.