अहिल्यानगरमध्ये पतसंस्थेच्या नावाखाली डेली कलेक्शन करणारा तब्बल ६३ लाख रूपये घेऊन झाला पसार, गुन्हा दाखल

Published on -

अहिल्यानगर- शहरातील एक डेली कलेक्शन करणाऱ्याने पतसंस्थेत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगून विश्वास संपादन करीत गुंतवणूकदारांची तब्बल ६३ लाख ८२ हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार जून २०१५ ते २९ जून २०२५ दरम्यान घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

संतोष हस्तीमल मावाणी (रा. दत्त मंदिराजवळ, सिव्हील हायको, सावेडी) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत प्रोफेसर कॉलनी चौकातील मारुतीराव मिसळ हॉटेलचे चालक अतुल दत्तात्रय खामकर (वय ३१, रा. गवळी वाडा, भिंगार, अहिल्यानगर) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली. फिर्यादीत म्हटले की, प्रोफेसर चौकात आमचे हॉटेल आहे. आरोपी
संतोष हस्तीमल मावाणी १० वर्षांपासून डेली कलेक्शन दररोज ४ ते ५ पाच हजार रुपये जमा करीत होतो. त्याने सुरुवातीला एका अज्ञात पतसंस्थेचे आणि नंतर दुर्गाशंकर मल्टीस्टेट पतसंस्थेचे पुस्तक दिले होते.

२९ जून रोजी मावाणी नेहमीप्रमाणे हॉटेलवर येऊन डेली कलेक्शनचे पुस्तक घेऊन गेला. मात्र, दुसऱ्या दिवशी त्याचा फोन बंद असल्याने फिर्यादी यांनी मावानी याच्या राहते घरी शोध घेतला असता त्याच्या घराला कुलूप असल्याचे निदर्शनास आले. शेजारील व्यापाऱ्यांनीही त्याचा शोध घेतला असता मावानी हा मध्यरात्री घर सोडून पळून गेल्याचे समजले. त्याच्याकडे डेली कलेक्शनचे ५ लाख रुपये होते. पतसंस्थेत १० लाख रुपये गुंतविले होते, असे एकूण १५ लाख रुपये गुंतविले होते.

त्याबाबत अधिक चौकशी केली असता मावानी याने वासुदेव द्वारकादास किंगर (रा. मुन्सिपल हडको सावेडी) यांचे २ लाख २० हजार रुपये, महेशकुमार बाळासाहेब नाईक (रा. सिव्हिल हडको अ. नगर) यांचे ६ लाख ८२ हजार रुपये, हरमितसिंग हरिसिंग चावला (रा. गोविंदपुरा, गुरुद्वारा जवळ अ.नगर) यांचे ८ लाख रुपये, कमल चमनलाल कंत्रोड (रा. तारकपूर अ.नगर) यांचे २२ लाख ८० हजार रुपये, डॉ. संतोष गायकवाड (माणिक नगर, अ.नगर) यांचे ९ लाख रुपये अशी ६३ लाख ८२ हजार रुपयाची फसवणूक केल्याचे समजले.

याबाबत अतुल खामकर यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार अर्ज दिला होता. चौकशीनंतर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. एन. गोटला करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!