जनता आपल्या कष्टातून कर भरते, त्यातूनच शासनाची तिजोरी चालते त्यामुळे अधिकाऱ्यांनी पारदर्शक सेवा द्यावी- आमदार आशुतोष काळे

Published on -

कोपरगाव- जनता आपल्या कष्टातून कर भरते आणि त्या कराच्या माध्यमातून शासनाची तिजोरी भरली जाते. याच करावर शासन यंत्रणा चालते, त्यामुळे प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्याने ही बाब लक्षात घेऊन पारदर्शक आणि तत्पर सेवा देणे आवश्यक आहे. प्रशासन आणि जनतेमध्ये विश्वासाचे नाते निर्माण करण्यासाठी ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी महसूल दिनानिमित्त कोपरगाव तहसील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात केले.

राज्य शासनाच्या निर्देशानुसार १ ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करण्यात आला असून, त्यानिमित्त महसूल विभागामार्फत महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात नागरिकांपर्यंत विविध योजनांची माहिती पोहोचविणे, चांगले काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करणे, तसेच जनतेमध्ये शासनाच्या कार्यपद्धतीबद्दल विश्वास निर्माण करणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

महसूल सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार काळे म्हणाले की, शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील गरजू आणि पात्र नागरिकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. यासाठी कार्यकर्त्यांनीदेखील सामाजिक जाणिवेतून सहभाग घ्यावा. समाजातील प्रत्येक घटकाशी आपला थेट संपर्क असतो. त्यामुळे कुणाला खरोखर मदतीची गरज आहे, याची खरी माहिती आपल्याकडे असते. अशा गरजू नागरिकांना मदत मिळवून देण्यासाठी आपण सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करायला हवेत.

महसूल विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या सेवा आणि योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवली जावी, यासाठी योग्य मार्गदर्शन करावे. अधिकाधिक पात्र गरजू नागरिकांना या योजनांचा लाभमिळेल, यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांचा आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या वेळी तहसीलदार महेश सावंत, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, भूमी अभिलेख विभागाचे रमाकांत डाहोरे, दुय्यम निबंधक पोपटराव कुसळकर, नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते, चंद्रशेखर कुलथे, मनिषा कुलकर्णी यांच्यासह मंडल अधिकारी व महसूल विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!