अहिल्यानगर- बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस आणणाऱ्या राहुरी पोलिस स्टेशनच्या अधिकारी व अंमलदारांचा विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे (नाशिक परिक्षेत्र) यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या प्रसंगी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, की राहुरी पोलिस पथकाने २८ जून २०२५ रोजी शहर हद्दीत धाडसी कारवाई करत बनावट नोटा प्रकरणी मोठा गौप्यस्फोट केला. अहिल्यानगर येथून मोटारसायकलवरून राहुरीकडे येणाऱ्या तीन इसमांकडे दोन लाख रुपयांच्या २०० व ५०० रुपयांच्या बनावट नोटा असल्याची गुप्त माहिती पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले. नगर-मनमाड रस्त्यावरील गाडगे महाराज आश्रम शाळा परिसरात सापळा लावून पोलिसांनी तीन इसमांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी संबंधित तिघांची अंगझडती घेतली असता दोन लाख रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या. अॅक्सिस बँक, राहुरी शाखेचे मॅनेजर कैलास वाणी यांनी घटनास्थळी सदर नोटा बनावट असल्याचे प्रमाणित केले. यानंतर पोलिसांनी मुद्देमाल जप्त करत आरोपींना अटक केली.
या कारवाईसाठी हवालदार सुरज गायकवाड यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात संबंधित आरोपींवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक संदिप मुरकुटे करीत आहेत. कारवाईत पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, पोलिस उपनिरीक्षक संदिप मुरकुटे, राजू जाधव, हवालदार सुरज गायकवाड, राहुल यादव, प्रमोद ढोकणे, नदीम शेख, सतीश कुऱ्हाडे, अंकुश भोसले, चालक शकुर सय्यद आदींनी सहभाग घेतला.
सन्मान सोहळ्यात विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, तसेच पथकातील विकास साळवे, सुरज गायकवाड, राहुल यादव, अंकुश भोसले, नदीम शेख, प्रमोद ढाकणे, सतीश कुराडे यांचा सन्मान करण्यात आला.