Vande Bharat Sleeper Train : देशातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार लवकरच देशाला वंदे भारत स्लीपरची भेट मिळणार आहे. वंदे भारतच्या अभूतपूर्व यशानंतर आता रेल्वे कडून या गाडीचे स्लीपर वर्जन लॉन्च केले जाणार आहे.
विशेष म्हणजे दिवाळीच्या आधीच हे व्हर्जन लॉन्च होण्याची शक्यता आहे. सुरवातीला राष्ट्रीय राजधानी दिल्लीवरून तीन महत्त्वाच्या शहरांसाठी वंदे भारत स्लीपर ट्रेन चालवली जाईल. यामुळे प्रवाशांना जलद, आरामदायी प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे.

चेअरकार प्रकारातील वंदे भारतमध्ये झोपण्याची सोय नाही फक्त बसून प्रवास करता येतो. पण शयनयान वंदे भारतमध्ये प्रवाशांना झोपून लांब पल्ल्याचा प्रवास करता येणे शक्य होईल. या गाडीमध्ये प्रवाशांना अगदीच वर्ल्ड क्लास सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.
या ट्रेनमध्ये प्रवाशांना दर्जेदार जेवणाची पण सोय मिळेल. शयनयान वंदे भारतमुळे प्रवासाचा कालावधी निम्म्यावर येणार आहे. एका रात्रीपेक्षा जास्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही ट्रेन एक मोठा फायदेशीर पर्याय ठरणार आहे.
लांब पल्ल्याच्या मार्गांवर ही नवीन ट्रेन सुरू होणार आहे. प्रवाशांची मागणी लक्षात घेता रेल्वेने सर्वप्रथम दिल्लीहून ही गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिल्ली – पटना, दिल्ली – अहमदाबाद व दिल्ली – भोपाल या मार्गांवर वंदे भारत स्लीपर ट्रेन चालवली जाणार आहे.
या प्रमुख शहरांमधून स्लीपर वंदे भारत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने प्रवाशांकडून रेल्वेच्या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. पण महाराष्ट्राला वंदे भारत स्लीपर ट्रेन साठी काही काळ वाट पहावी लागणार असल्याचे यावरून स्पष्ट होते.
खरंतर मध्यंतरी मीडिया रिपोर्ट्स मध्ये दिल्ली – मुंबई मार्गावर ही गाडी सुरू होऊ शकते असा अंदाज होता. पण आता या गाडीच्या तीन संभाव्य मार्गांमध्ये आर्थिक राजधानीचे नाव कुठेच दिसत नाही.