Pune News : अलीकडील काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. पुण्यातही अनेक प्रकल्पांची कामे पूर्णत्वाला गेली आहेत तसेच काही प्रकल्पांची कामे अजूनही सुरूच आहेत.
दरम्यान, पुणेकरांच्या गतीमान प्रवासासाठी महत्त्वाकांक्षी ठरणाऱ्या येरवडा ते कात्रज भुयारी मार्ग प्रकल्पाचे भवितव्य पुढील दीड महिन्यांत ठरणार असल्याची माहिती मिळाली आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) या प्रकल्पासाठी मोनार्क एजन्सीची नेमणूक केली असून, एजन्सीकडून सध्या वाहतुकीवरील शास्त्रीय अभ्यास सुरू आहे.
या प्रकल्पांतर्गत 6 लेनचे दोन स्वतंत्र भुयारी मार्ग उभारले जाणार असून, यासाठी तब्बल 7509 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. इतक्या मोठ्या खर्चाच्या प्रकल्पाची उपयुक्तता तपासण्यासाठी वाहतूक कोंडी, वाहनांची दैनंदिन संख्या आणि भविष्यातील प्रवासी मागणी यावर सखोल सर्वेक्षण केले जात आहे.
गेल्या दीड महिन्यापासून प्रत्यक्ष सर्वेक्षण सुरू असून, उर्वरित काळात अंतिम अहवाल तयार केला जाणार आहे. मोनार्क एजन्सी तीन महिन्यांच्या अभ्यासानंतर सविस्तर अहवाल सादर करणार आहे.
दररोज वाढत्या वाहनसंख्येमुळे पुण्यातील रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. नागरिकांच्या प्रवासात होणारा विलंब, प्रदूषण तसेच इंधनाचा अपव्यय या समस्या सोडविण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. तथापि, या भुयारी मार्गामुळे प्रत्यक्षात गर्दी कितपत कमी होईल, यावरच प्रकल्पाची उपयुक्तता अवलंबून राहणार आहे.
हा प्रकल्प पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे यांच्या पुढाकाराने राबविण्यात येत असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. दरम्यान, पुण्यात रिंगरोड, महामार्ग जोडणीसह इतर वाहतूक प्रकल्पांनाही गती देण्यात आली आहे.
मात्र, त्यामध्ये सर्वाधिक महत्त्व येरवडा–कात्रज भुयारी मार्गाला देण्यात येत आहे. अंतिम अहवाल आल्यानंतर मुख्यमंत्रीच या प्रकल्पावर शिक्कामोर्तब करणार आहेत.