GST On Bikes : केंद्रातील मोदी सरकारने अलीकडेच सर्वसामान्यांसाठी एक मोठी घोषणा केली. सरकारने जीएसटी दरात कपात केली आहे. यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला असून, विशेषतः दुचाकींच्या बाजारपेठेत सकारात्मक बदल अपेक्षित आहेत.
सरकारकडून जाहीर करण्यात आलेले जीएसटीचे नवीन रेट 22 सप्टेंबर पासून लागू होणार आहे. पण त्या आधीच कोणती वस्तू किती स्वस्त होणार याबाबत चर्चा सुरू आहेत. खरेतर, मागील आठवड्यात झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत कररचनेत मोठे बदल करण्यात आले.

याअंतर्गत आता देशभरात 5% आणि 18% अशा दोन टप्प्यांतील जीएसटी रचना लागू होणार आहे. सध्याच्या चार टप्प्यांच्या संरचनेपेक्षा ही रचना सोपी आणि प्रभावी ठरणार आहे. या बदलाचा सर्वाधिक परिणाम दुचाकी बाजारावर होणार आहे.
विशेषतः 350 सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या इंजिन असलेल्या दुचाकींवरील जीएसटी दर थेट 28% वरून 18% इतका कमी करण्यात आला आहे. यामुळे या दुचाकींच्या अंतिम किमतीत लक्षणीय घट होणार आहे.
अद्याप काही कंपन्यांनी या कपातीचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवलेला नसला तरी, पुढील काही दिवसांत कंपन्या नवे दर जाहीर करतील अशी अपेक्षा आहे. यामुळे दुचाकींच्या मागणीत मोठी वाढ होईल आणि बाजारपेठेला गती मिळेल, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
किंमतीत होणाऱ्या बदलांकडे पाहिल्यास, बजाज प्लॅटिना 110 ची सध्याची किंमत 71,558 रुपये असून ती 66,007 रुपयांवर येण्याची शक्यता आहे. टीव्हीएस मोटर कंपनीने ग्राहकांना जीएसटी कपातीचा पूर्ण लाभ देण्याची घोषणा केली आहे.
त्यामुळे त्यांचे लोकप्रिय मॉडेल टीव्हीएस रायडर 125 सुमारे 8,000 रुपयांनी स्वस्त होणार असून किंमत 96,000 रुपयांपर्यंत खाली येईल. तसेच, हिरो एचएफ डिलक्सच्या किमतीतही 5,683 रुपयांची घट अपेक्षित आहे. होंडा शाईन 125 ची किंमत 7036 रुपयांनी कमी होणार आहे.
होंडा सीबी शाइन एसपीची किंमत 12865 ने कमी होणार आहे. या निर्णयामुळे दुचाकी विक्रीत मोठ्या प्रमाणावर वाढ होऊन संपूर्ण ऑटोमोबाईल क्षेत्राला चालना मिळेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.