Pune News : राज्यासह संपूर्ण देशभरात स्वच्छ भारत मिशन सुरू करण्यात आले आहे. दरम्यान याच स्वच्छ भारत मिशन उपक्रमाचा एक भाग म्हणून पुणे महापालिकेने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. पुणे महापालिकेकडून नवीन योजना सुरू करण्यात आली असून या अंतर्गत गोरगरीब गरजवंत लोकांना संसारासाठी आवश्यक असणाऱ्या काही वस्तू मोफत मिळणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार महापालिकेने शहरात RRR अर्थात Reduce-Reuse-Recycle नावाची योजना सुरू केली आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पुणे महापालिकेने आर आर आर केंद्रे सुरू केली आहेत.

घरातील न वापरल्या जाणाऱ्या पण उपयुक्त वस्तू या केंद्रात जमा करता येणार आहेत. केंद्रात जमा झालेल्या या वस्तू पुढे थेट गरजूंपर्यंत पोहोचवल्या जातील. नागरिकांमध्ये पुनर्वापराची संस्कृती रुजावी यासाठी महापालिकेने हा उपक्रम हाती घेतला आहे.
पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर सिंग आणि अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. हा उपक्रम उपायुक्त सचिन कुमार यांच्या देखरेखे खाली राबवला जातोय.
या उपक्रमांतर्गत शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालयांच्या प्रभागात आरआरआर केंद्र सुरू करण्यात आली आहेत. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून हा उपक्रम राबवला जातोय.
या उपक्रमामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये पुनर्वापराची संस्कृती उदयास येणार आहे. महत्त्वाचे बाब म्हणजे या योजनेतून गोरगरीब जनतेला संसारासाठी आवश्यक काही वस्तू उपलब्ध होणार आहेत.
महापालिकेकडून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत नागरिक सदर केंद्रांमध्ये जुन्या पण चांगल्या स्थितीत असलेल्या वस्तू जमा करू शकतील. जुनी पुस्तके,
वह्या, शालेय साहित्य, कपडे, चादरी, लहान मुलांची खेळणी, घरगुती भांडी, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, चपला अशा वस्तू या केंद्रांमध्ये जमा करता येणार आहेत.
पुढे या जमा झालेल्या वस्तूंचे वर्गीकरण करून त्या गरजू नागरिकांना मोफत दिल्या जाणार आहेत. यातून ज्या वस्तू उरतील त्या उर्वरित वस्तूंचे रिसायकल केले जाणार आहेत आणि त्या पुन्हा वापरण्यायोग्य बनवल्या जातील.