Maharashtra News : आपल्या गावाचा सर्वांगीण विकास व्हावा ही प्रत्येकाची इच्छा असते. आता गावाच्या विकासात ग्रामपंचायतची भूमिका महत्त्वाची आहे. पण अनेकदा सरपंच, सदस्य व ग्रामसेवक व्यवस्थित काम करत नाहीत. अनेक नागरिक सरपंच तसेच ग्रामसेवक व इतर प्रशासकीय अधिकारी वेळेत काम करत नाहीत अशी तक्रार करत असतात.
ग्रामपंचायत मार्फत होणारी विकासाची कामे तसेच शासकीय योजनांची अंमलबजावणी वेळेवर केली जात नाही. यामुळे गावांचा विकास खुंटतो. सर्वसामान्य नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो.

अनेक गावांमध्ये रस्ते दुरुस्ती, पाणीपुरवठा, गटारी बांधकाम, स्वच्छता व्यवस्था अशी कामे वेळेत होत नाहीत. शासकीय योजना व्यवस्थित राबवल्या जात नाहीत. अशावेळी नागरिकांना सरपंच तसेच ग्रामसेवक विरोधात तक्रार करायची असते.
ग्रामपंचायतींना घटनादुरुस्तीद्वारे घटनात्मक मान्यता प्राप्त झाली आहे. यातून गावातील रस्ते, पाणी, वीज, स्वच्छता, शासकीय योजना, जन्म-मृत्यू दाखले, इमारत परवाने, कर वसुली, तसेच केंद्र-राज्य सरकारच्या योजना राबविण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीवर सोपवण्यात आली आहे.
गावातील सरपंच हा ग्रामपंचायतीचा प्रमुख असतो तर ग्रामसेवक हा मुख्य प्रशासकीय अधिकारी असतो. यामुळे गावातील विकास कामांची जबाबदारी या दोघांवर असते. म्हणून जर गावातील विकास कामे वेळेवर झाली नाही तर ग्रामसेवक व सरपंचांची रीतसर तक्रार करता येते.
दरम्यान आता आपण ही तक्रार नेमकी कुठे करायची याबाबत माहिती पाहणार आहोत. नागरिकांना सर्वप्रथम पंचायत समितीमध्ये जाऊन गटविकास अधिकाऱ्याकडे तक्रार करता येते.
ज्यावेळी पंचायत समितीकडून तक्रारीवर ॲक्शन घेतली जात नाही त्यावेळी ग्रामस्थ जिल्हा परिषदेत जाऊन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार करू शकतात. ग्रामसभेत सुद्धा तक्रार करता येते.
ग्रामसभेत प्रश्न मांडून नागरिकांना याचा ठराव करता येतो. सरपंच किंवा सदस्यांकडून गैरवर्तन, भ्रष्टाचार किंवा निष्क्रियता दाखवली जात असेल तर नागरिकांना निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येते.
तसेच आपले सरकार किंवा जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर नागरिकांना तक्रार करता येते. नागरिकांनी तक्रार केल्यानंतर त्यावर काहीच ॲक्शन घेण्यात आली नाही तर महसूल अधिकारी, लोकायुक्त कार्यालय किंवा हायकोर्टात याचिका दाखल करता येते.