साडेतीन शक्तीपीठांच्या दर्शनासाठी एसटी महामंडळाची नवी योजना ! 27 सप्टेंबर पासून सुरु होणार विशेष बससेवा, तिकीट किती असेल?

Published on -

ST News : महाराष्ट्र राज्यातील एसटी प्रवाशांसाठी एक गुड न्यूज समोर येत आहे. राज्यमार्ग परिवहन महामंडळाकडून नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या काही दिवसांनी नवरात्र उत्सवाची सुरुवात होणार आहे आणि या काळात अनेक जण शक्तीपीठांच्या दर्शनाला जाणार आहेत.

कोल्हापूर तुळजापूर माहूर आणि सप्तशृंगी गडावर अनेक भाविक नवरात्रोत्सवाच्या काळात दर्शनाला जातील. याच अनुषंगाने आता एसटी महामंडळाकडून शक्तीपीठ दर्शनासाठी विशेष बस सेवा सुरू करण्यात येणार आहे.

27 सप्टेंबर पासून ही नवीन बस सेवा सुरू होणार आहे. या नव्या सेवेचा फायदा पुणे जिल्ह्यातील भाविकांना होणार आहे. पुणे विभागातून ही नवीन बससेवा सुरू केली जाणार आहे. ही नवीन बस विभागातील शिवाजीनगर, स्वारगेट आगारातून सोडली जाणार आहे.

नवरात्र उत्सवामध्ये ही विशेष बस चालवली जाणार असून या बससेवेमुळे महालक्ष्मी, तुळजाभवानी, रेणुका माता आणि सप्तशृंगी देवीचे दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांचा प्रवास सोयीचा होणार आहे.

शक्तिपीठ दर्शनासाठी चालवली जाणारी ही स्पेशल बस शिवाजीनगर स्वारगेट आगारातून सकाळी सात वाजता सोडली जाईल. 27 सप्टेंबरला पहिली बस सोडली जाणार आहे. आतापर्यंत यासाठी 30 जणांनी बुकिंग केली आहे.

या गाडीचे प्रवासी भाडे 3101 रुपये आहे. या गाडीने दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना एसटीच्या सवलतीचा लाभ दिला जाणार आहे. महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना 50% सवलत दिली जाणार आहे.

त्यामुळे ज्यांना नवरात्र उत्सवात शक्तिपीठ दर्शनाला जायचे असेल त्यांनी या विशेष गाडीचा लाभ घ्यावा असे आवाहन महामंडळाकडून करण्यात आले आहे. 22 सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या काळात ही विशेष गाडी चालवण्यात येणार असल्याने याचा भाविकांना मोठा लाभ होईल.

दरम्यान नवरात्र उत्सवाच्या काळात सप्तशृंगी गडावर येणाऱ्या भाविकांसाठी प्रशासनाने नांदुरी ते सप्तशृंगी गड या मार्गावरील खाजगी वाहतूक पूर्णतः बंद करण्याचा निर्णय घेतलाय. या काळात फक्त एसटी महामंडळाच्या बसेस चालवल्या जाणार आहेत. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe