यात्रीगण कृपया ध्यान दे….! अहमदनगर रेल्वे स्थानकाचे नाव बदलले, मध्य रेल्वेची अधिसूचना निघाली

Published on -

Ahilyanagar News : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी अहमदनगर रेल्वे स्थानकाहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अधिक खास ठरणार आहे. अहमदनगर शहराचे नामांतरण झाल्यानंतर आता रेल्वे स्थानकाचे सुद्धा नामांतरण करण्यात आले आहे.

येथील रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याची अधिकृत अधिसूचना नुकतीचं निर्गमित करण्यात आली आहे. गेल्या वर्षी अहमदनगर शहराचे नाव अहिल्यानगर करण्यात आले. आता रेल्वे स्थानकाचे नाव सुद्धा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मरणार्थ अहिल्यानगर करण्यात आले आहे.

गेल्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्य शासनाने अहमदनगर रेल्वे स्टेशनचे नाव बदलण्याची अधिसूचना काढली होती.

यानंतर आता मध्य रेल्वेच्या वतीने एक प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आले आहे. यात अहमदनगर रेल्वे स्टेशन आता अहिल्यानगर म्हणून ओळखले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

खरे तर गेल्या महिन्यात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी या संदर्भात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत पत्रव्यवहार केला होता.

रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्यासंदर्भात त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना पत्राद्वारे निवेदन दिले होते. शहराच्या नवीन नावाप्रमाणे स्थानकाचे सुद्धा नाव असावे अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली होती.

अहमदनगर शहराचे नामकरण झाल्यानंतर जिल्ह्यातील अनेक संघटनांनी आणि रेल्वे प्रवाशांनी स्थानकाचे नाव सुद्धा शहराच्या नावाप्रमाणेच असावे यासाठी लोकप्रतिनिधींकडे मागणी उपस्थित केली होती.

यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू केला. हाचं पाठपुरावा आता यशस्वी झाला आहे. रेल्वे स्थानकाचे नाव चेंज झाले आहे, पण स्थानकाचा कोड तोच राहणार आहे.

याबाबत मध्य रेल्वेने प्रसिद्धी पत्रकात माहिती दिली आहे. प्रसिद्धीपत्रकात स्टेशन कोडमध्ये कोणताही बदल होणार नाही आणि अहिल्यानगरचा स्टेशन कोड एएनजीच राहील असे स्पष्ट करण्यात आले.

शासनाच्या या निर्णयामुळे सध्या नगरकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. प्रवाशांकडून शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe