E Bike Taxi : देशाच्या आर्थिक राजधानीत आता स्वस्तात मस्त प्रवास करता येणार आहे. यामुळे मुंबईतील लाखो नागरिकांना दिलासा मिळणार आहे. शहरातील नागरिकांचा प्रवास स्वस्त आणि वेगवान व्हावा यासाठी शहरात ई-बाईक टॅक्सी सुरू करण्यात आली आहे.
आज मुंबई व उपनगरांमध्ये इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी सेवा अधिकृतपणे सुरू करण्यात आलीये. विशेष म्हणजे बाईक टॅक्सीचे भाडे सुद्धा निश्चित झाले. राज्य परिवहन प्राधिकरणाने याचे भाडे निश्चित केले आहे.

खरंतर अलीकडेच महाराष्ट्र राज्य शासनाने मोठ्या लोकसंख्येच्या शहरांमध्ये बाईक टॅक्सी चालवण्याचा निर्णय घेतला होता. एका लाखांहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरांमध्ये ई बाईक टॅक्सी सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बाईक टॅक्सीने 1.5 किमी प्रवासासाठी किमान भाडे 15 रुपये ठरवले गेले आहे. यानंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी 10.27 रुपये आकारले जातील. जे की टॅक्सी अन रिक्षापेक्षा कमी आहे. ऑटो रिक्षाने प्रवास करताना 26 रुपये भाडे लागते.
टॅक्सीने प्रवास करण्यासाठी यापेक्षा अधिकचा खर्च करावा लागतो. त्यामुळे बाईक टॅक्सी सुरू झाल्याने सर्वसामान्य मुंबईकरांचे पैसे वाचणार आहेत. दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती दिली आहे. सरनाईक यांनी सांगितल्याप्रमाणे सरकारकडून महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम 2025 अंतर्गत तीन कंपन्यांना बाईक टॅक्सी साठी तात्पुरते लायसन्स देण्यात आले आहेत.
ओला, उबर आणि रॅपिडो या तीन कंपन्यांना परवाने मिळाले आहेत. पण, या कंपन्यांनी एका महिन्याच्या आत सर्व अटी पूर्ण करून कायमस्वरूपी परवाना घेणे आवश्यक आहे.
चौथ्या कंपनीला आवश्यक अटी पूर्ण न केल्यामुळे परवाना नाकारण्यात आला आहे. बाईक टॅक्सी बुकिंगसाठी प्रवासी ओला, उबर किंवा रॅपिडोच्या मोबाईल ॲपचा वापर करू शकतात.
ॲपमध्ये ‘बाईक टॅक्सी’ पर्याय निवडून जवळचा चालक मिळवता येईल आणि भाडे थेट ॲपवरच पाहता येईल. ही सेवा सुरू झाल्यास ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. ह्या नव्या सुविधेमुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी होईल.