Pune News : शहरातील मेट्रो संदर्भात महत्त्वाची माहिती समोर येत आहे. पुण्यात सध्या दोन मेट्रो मार्ग सुरू आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका – स्वारगेट व वनाज – रामवाडी या मार्गांवर मेट्रो धावत आहे. आता पुण्याला तिसऱ्या नव्या मार्गाची भेट मिळणार आहे.
शिवाजीनगरपासून हिंजवडीपर्यंत लवकरच मेट्रो धावतांना दिसणार आहे. शहराच्या वाहतुकीसाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या याच मेट्रो मार्ग बाबत आता एक नवीन अपडेट समोर आली आहे. या मार्गाचा ताबा पुढील दहा वर्षांसाठी एका खाजगी कंपनीकडे देण्यात आला आहे.

खरे तर हा मेट्रो मार्ग पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्त्वावर विकसित होतोय. यानुसार आता फ्रान्समधील ख्यातनाम कंपनी किओलीस कडे याचा ताबा असेल अशी माहिती समोर आली आहे.
याबाबत पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड (पीआयटीसीएमआरएल) आणि किओलीस यांच्यात नुकताच करार झालाय. अर्थात आता या मार्गाची संपूर्ण देखभाल, तिकीट प्रणाली व गाड्यांचे संचालन किओलीसकडून होणार आहे.
कधी सुरु होणार मार्ग?
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या मार्गाचे काम करत आहे. 23 किलोमीटर लांबीच्या या मार्गावर 23 स्थानक आहेत. या मार्गाचे आजवर 87 टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे.
तसेच या प्रकल्पाचे काम मार्च 2026 मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. या मेट्रो मार्गासाठी 8313 कोटी रुपयांचा खर्च केला जात आहे.
ही मेट्रो मार्गिका पुण्यातील माहिती तंत्रज्ञान केंद्र असलेल्या हिंजवडी व जिल्हा प्रशासनाचे मुख्यालय असलेल्या शिवाजीनगर यांना जोडणार आहे.
याचा लाखों आयटी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. या मार्गिकेवर किओलीस अल्स्टॉमकडून पुरवलेल्या 22 गाड्या धावणार आहेत. त्यांची देखभालही किओलीसकडेच सोपवण्यात आली आहे.
या मार्गावर धावणाऱ्या मेट्रोवरील सर्व पायलट महिला राहणार आहेत. नक्कीच महिला सक्षमीकरणाच्या अनुषंगाने घेण्यात आलेला हा निर्णय कौतुकास्पद आहे आणि यामुळे महिलांचे मनोबल वाढणार आहे.