Government Scheme : सरकार सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी सातत्याने नवनवीन योजना सुरू करत असते. या कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे हित जोपासण्याचा प्रामाणिक प्रयत्न सरकारकडून केला जात असतो. समाजातील शोषित वंचित आर्थिक दृष्ट्या मागास घटकातील नागरिकांसाठी सरकारने आत्तापर्यंत असंख्य योजना सुरू केल्या आहेत.
समाजातील पारंपारिक कलाकार, कारागीर, शिल्पकार यांच्या उद्धारासाठी देखील केंद्रातील सरकारने अशीच एक योजना सुरू केली आहे. ज्याला पीएम विश्वकर्मा योजना असे नाव देण्यात आले आहे. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना पाच टक्के व्याजदरावरती 3 लाख रुपयांचे कर्ज दिले जात आहे.

समाजाच्या विकासात मोलाची भूमिका निभावणाऱ्या कारागिरांना, कलाकारांना गेल्या काही काळापासून आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय. कमी संसाधन, पैशांची कमतरता, ओळखींचा अभाव अशा अडचणींमुळे कारागिरांना आता आपली उपजीविका भागवतांना सुद्धा अडचण येत आहे.
याच साऱ्या पार्श्वभूमीवर 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम विश्वकर्मा योजनेची सुरुवात केली. याअंतर्गत दोन टप्प्यात तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. असुरक्षित प्रकारातील कर्ज असतानाही यावर फक्त पाच टक्के व्याजदर आकारला जातो.
सोबतच या योजनेतून लाभार्थ्यांना प्रशिक्षण मिळते. पंधरा हजार रुपयांचे टूलकिट दिले जाते. प्रशिक्षण काळात दररोज 500 रुपयांचा स्टायपेंड दिला जातो. योजनेचे प्रशिक्षण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र मिळते.
या योजनेतून पहिल्या टप्प्यात एक लाख रुपयांचे कर्ज मिळते. कर्जाची योग्य पद्धतीने परतफेड केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात दोन लाख रुपयांचे कर्ज दिले जाते. या योजनेसाठी 18 ते 50 वर्षे वयोगटातील नागरिक अर्ज करू शकतात.
या योजनेतुन 18 पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या कारागिरांना, शिल्पकारांना आर्थिक मदत दिली जात आहे. pmvishwakarma.gov.in या वेबसाईटवर योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
योजनेसाठी ज्या इच्छुकांना अर्ज करायचा असेल त्यांनी अधिकृत संकेतस्थळावर वेळ न दवडता अर्ज सादर करावा. अर्ज सादर करताना आवश्यक कागदपत्र देखील अपलोड करावीत.
कोण कोणती कागदपत्रे लागतात ?
आधार कार्ड
पॅनकार्ड
उत्पन्नाचा दाखला
जातीचा दाखला
ओळखपत्र
रहिवासी दाखला
पासपोर्ट आकाराचा फोटो
बँकेचं पासबुक
मोबाइल क्रमांक