Maharashtra ST News : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. यापुढे सर्वसामान्यांचा एसटी प्रवास महाग होणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) एसटी बसच्या तिकीट दरांमध्ये मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतलाय.
याची अंमलबजावणी सुद्धा सुरू झाली आहे. एसटीच्या तिकीट दरात सरासरी 15 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. ही वाढ 25 जानेवारी 2025 रोजी जाहीर करण्यात आली होती. पण आता प्रत्यक्षात ही वाढ अंमलात आली आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे एसटी महामंडळाच्या सर्वच बसेसला ही वाढ लागू राहणार आहे. भाडेवाढ केवळ साध्या लालपरीपुरती मर्यादित नसून शिवशाही, शिवनेरी व शिवनेरी स्लीपर अशा आलिशान व वातानुकूलित बसेसमध्ये सुद्धा ही वाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यामुळे आता लाल परी चा प्रवास मागणार आहे. या निर्णयाचा ग्रामीण भागातील प्रवाशांना सर्वाधिक फटका बसेल. कारण गावाकडे एसटी हेच प्रवासाचे प्रमुख साधन असते. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये एसटी महामंडळाच्या या निर्णयावर विरोधात तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे.
साध्या एसटी बससाठी (लालपरी) पहिल्या 6 किलोमीटरच्या टप्प्यासाठी तिकीट दर 10.05 रुपये निश्चित करण्यात आला आहे. तर शिवशाही एसी बससाठी प्रति 6 किलोमीटरच्या टप्प्यासाठी आता 16 रुपये आकारले जाणार आहेत.
शिवनेरीच्या भाड्यातही वाढ झालीये. महामंडळाच्या मते, गेल्या तीन वर्षांत तिकीट दरात कोणताही बदल झाला नव्हता. पण, डिझेलचे दर, कर्मचारी पगार, महागाई भत्ता आणि बस दुरुस्तीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला.
यामुळे एसटी महामंडळाला मोठ्या आर्थिक तोट्याला सामोरे जावे लागत होते. यामुळे एसटीच्या तिकीट दरात वाढ होणे अपेक्षित होते. आता हाकीम समितीच्या शिफारशींनुसार ही वाढ मंजूर करण्यात आलीये.
त्यामुळे महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्याची अपेक्षा आहे. दरवाढीमुळे दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे. दुसरीकडे आता राजकीय पक्षांनी या निर्णयावर तीव्र टीका करत दरवाढ तातडीने मागे घेण्याची मागणी यावेळी उपस्थित केली आहे.