Bullet Train Project : भारतीय रेल्वेने गेल्या काही वर्षांमध्ये नेत्रदीपक प्रगती केली आहे. अलीकडेच देशात वंदे भारत ट्रेन सुरु झालीये. विशेष म्हणजे लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेन सुद्धा सुरू होणार आहे. येत्या काही वर्षांनी आता बुलेट ट्रेन सुद्धा रुळावर येणार आहे.
2027 मध्ये बुलेट ट्रेन प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार अशी माहिती देण्यात आली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे. ही सेवा सुरु झाली की मुंबई-अहमदाबाद प्रवास फक्त दोन तासांचा राहणार आहे.

या प्रकल्पाचा पहिला टप्पा येत्या 2 वर्षात सुरु होणार असा अंदाज आहे. ऑगस्ट 2027 पर्यंत मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा प्रवाशांच्या सेवेत येणार असल्याची माहिती स्वतः केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या माध्यमातून समोर आली आहे.
त्यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर ही माहिती दिली आहे. पहिल्या टप्प्यात सुरतमधील सुमारे 50 किलोमीटरच्या मार्गावर बुलेट ट्रेन धावणार आहे. इकडे मुंबईतील बुलेट ट्रेन स्टेशनचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे.
हा प्रकल्प ज्या गतीने पुढे सरकत आहे, त्यावरून 2027 पर्यंत ट्रेन धावणार असल्याची खात्री व्यक्त केली जात आहे. या ट्रेनमुळे मुंबई – अहमदाबादमधील व्यापार, प्रवास अधिक वेगवान होणार आहे.
या मार्गावरील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे उभारण्यात येणारे स्टेशन हे एकमेव भूमिगत स्टेशन राहणार आहे. या ठिकाणी जमिनीखाली तब्बल 32.50 मीटर खोलीपर्यंत उत्खनन करण्यात येत आहे.
स्टेशनमध्ये तीन मजले असतील – प्लॅटफॉर्म, कॉन्कोर्स आणि सर्व्हिस फ्लोअर. अंदाजे 26 मीटर खोलीवर प्लॅटफॉर्म उभारण्याची योजना आहे. या मार्गावरील सर्व स्टेशनांवर सहा प्लॅटफॉर्म असतील.
प्रत्येक प्लॅटफॉर्म अंदाजे 415 मीटर लांब असेल, ज्यामुळे बुलेट ट्रेन सहज थांबू शकेल. तसेच या स्टेशनांना मेट्रो लाईन्स आणि रोडवेजशी जोडले जाणार आहे.
दोन प्रवेश आणि दोन निर्गमन मार्ग योजनेत समाविष्ट आहेत. एका बाजूला मेट्रो लाईन 2 बी वरील स्टेशनपर्यंत थेट जोडणी असेल, तर दुसरा मार्ग एमटीएनएल इमारतीकडे नेईल.
रेल्वेमंत्र्यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रकल्पाचा व्हिडिओ शेअर केला असून त्याला मोठा प्रतिसाद सुद्धा मिळत आहे. अनेकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. तर काही लोकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय.