Maharashtra News : राज्यातील शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर येत्या दोन दिवसांनी नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. 22 सप्टेंबर रोजी घटस्थापना आणि याच दिवसापासून नवरात्र उत्सव सुरू होईल.
दरम्यान घटस्थापनेच्या दिवशी राज्यातील काही जिल्ह्यांमधील सर्व शाळा शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी राहणार आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

परंतु राज्यातील सर्वच जिल्ह्यांना घटस्थापनेच्या दिवशी शासकीय सुट्टी मिळणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार ज्या जिल्हाधिकाऱ्यांनी किंवा विभागीय आयुक्तांनी घटस्थापनेच्या दिवशी शासकीय सुट्टी दिलेली आहे त्याच जिल्ह्यांमध्ये सुट्टी राहणार आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या शासकीय सुट्ट्यांच्या यादीमध्ये 22 सप्टेंबर 2025 ची सुट्टी देण्यात आलेली नाही. अर्थात यावर्षी राज्य शासनाने घटस्थापनेला शासकीय सुट्टी दिलेली नाही. पण काही जिल्हा अधिकाऱ्यांनी तसेच विभागीय आयुक्तांनी आपल्या अधिकार क्षेत्रातील सुट्ट्यांमधून घटस्थापनेला सुट्टी दिलेली आहे.
अर्थात आता ज्या जिल्हाधिकाऱ्यांनी किंवा विभागीय आयुक्तांनी घटस्थापनेच्या दिवशी सुट्टी मंजूर केलेली आहे त्या जिल्ह्यांमधील शाळांना, महाविद्यालयांना, शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांना सुट्टी राहणार आहे.
दरम्यान आत्तापर्यंत जी माहिती हाती आली आहे त्यानुसार जळगाव पुणे आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांमधील जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारात क्षेत्रातील सुट्टीचा वापर करत 22 सप्टेंबर रोजी घटस्थापना निमित्ताने शासकीय सुट्टी मंजूर केली आहे.
या अनुषंगाने संबंधित जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्त कार्यालयाकडून परिपत्रक सुद्धा निर्गमित करण्यात आले आहे. दरम्यान, या संबंधित जिल्ह्यातील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना 20 सप्टेंबर पासून सलग तीन दिवस सुट्टी राहणार आहे.
थोडक्यात यावर्षी घटस्थापना निमित्ताने संपूर्ण राज्यभर शासकीय सुट्टी राहणार नाही. ज्या जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सुट्टी या दिवशी मंजूर केली असेल त्याच जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांना तसेच शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना शासकीय सुट्टीचा आनंद घेता येणार आहे.