अहिल्यानगरकरांसाठी महत्त्वाची बातमी ! 21 सप्टेंबरपासून ‘या’ मार्गांवरील वाहतूक वळवली जाणार

Published on -

Ahilyanagar News : येत्या दोन दिवसांनी नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. 22 सप्टेंबरला घटस्थापना असेल अन या दिवसापासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होईल. दरम्यान नवरात्र उत्सवाला सुरुवात होण्याआधीच अहिल्यानगरकरांसाठी एक महत्त्वाचे अपडेट हाती आले आहे.

अहिल्यानगर शहरातील वाहतूकीत बदल करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या अतिरिक्त गर्दीच्या अनुषंगाने प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

यामुळे नवरात्र उत्सवात अहिल्यानगरहुन बाहेर पडणाऱ्या आणि बाहेरून शहरात येणाऱ्या प्रवाशांना या बदलाची नोंद घ्यावी लागणार आहे. जिल्हा दंडाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी याबाबतचे परिपत्रक निर्गमित केले आहे. आता आपण कोणत्या मार्गांवरील वाहतूक प्रशासनाने पर्यायी मार्गाने वळवली आहे याबाबत थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

21 सप्टेंबर पासून 2 ऑक्टोबर पर्यंत पुणे-छत्रपती संभाजीनगर, मनमाड-दौंड, कल्याण-पाथर्डी हायवेवरून येणाऱ्या वाहतुकीस पर्यायी मार्गाने वळवण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर-मनमाड या शहराकडून येऊन पुणे व कल्याणकडे जाणारी जड वाहतूक शेंडी-निंबळक-केडगाव मार्गे पाठवली जाणार आहे.

तर पुण्याकडून येऊन मनमाड व छत्रपती संभाजीनगर शहराकडे जाणारी जड वाहतूक केडगाव-निंबळक-शेंडी मार्गे वळविण्याचा निर्णय झाला आहे. तसेच या काळात सकाळी तीन वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत शहरातील बाजारपेठेत येणाऱ्या सर्व प्रकारच्या मालवाहतूकीला बंदी घालण्यात आली आहे.

पण रेशनिंग व निवडणूक कर्तव्यावरील वाहने यातून वगळण्यात आली आहेत. त्याचवेळी रात्री 10 पासून सकाळी तीन पर्यंत जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या मालगाड्यांना या भागात प्रवेश मिळणार आहे. सोबतच रात्री 10 पासून सकाळी तीन पर्यंतचा कालावधी वगळल्यास इतर वेळेस शहर हद्दीत हलकी व अवजड वाहने पार्किंग करण्यास बंदी राहणार आहे.

सार्वजनिक जागेत किंवा रस्त्यांच्या आजूबाजूला कोणत्याही प्रकारची वाहने पार्किंग करता येणार नाहीत. प्रशासनाकडून या संदर्भातील सुधारित अधिसूचना नुकतीच जारी करण्यात आली आहे. तसेच या अधिसूचनेनुसार नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News