Silver Price: तुम्ही देखील चांदीत गुंतवणूक करत आहात? तर आधी ‘हे’ वाचा… नाहीतर नुकसान अटळ

Published on -

Silver Price:- गेल्या काही महिन्यांपासून जर आपण बघितले तर सोने-चांदीच्या दराने ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे व दिवसागणिक सोने चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ होताना आपल्याला दिसून येत आहे. सोन्या आणि चांदीच्या दरांनी सध्या एक लाखाचा टप्पा पार केला असून चांदीने तर हा टप्पा आधीच पार केलेला आहे. सध्या जर आपण परिस्थिती बघितली तर सोन्याच्या तुलनेमध्ये चांदीचा दर वाढ होण्याचा वेग जास्त असल्याचे दिसून येत आहे. चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढत असून यामध्ये अगोदर पेक्षा जवळपास 20 ते 30 टक्क्यांची अधिक वाढ दिसून येत आहे. यावर्षी चांदीच्या किमतींमध्ये 43 टक्क्यांची वाढ झालेली आहे तर सोन्याच्या किमतीमध्ये 37% वाढ नोंदवली गेलेली आहे. एक प्रकारे गुंतवणुकीसाठी सोन्याची जागा चांदीने घेतल्याचे सध्या चित्र आहे. परंतु खरंच चांदीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणे फायद्याचे आहे का? हा देखील या निमित्ताने मोठा प्रश्न निर्माण होत आहे. याबाबत काही तज्ञांचे मत आहे की चांदीतील अशा प्रकारची मोठी गुंतवणूक येणाऱ्या काळात धोकादायक ठरू शकते. तज्ञांच्या मते चांदी अत्यंत अस्थिर असल्यामुळे फार जास्त कालावधीसाठी ती उच्चांकी दर पातळीवर राहील अशी शाश्वती नसल्याचा दावा तज्ञांनी केलेला आहे.

चांदी सोन्यापेक्षा अस्थिर

सोने आणि चांदीच्या बाबतीत जर आपण बघितले तर सोन्यापेक्षा चांदी अधिक अस्थिर मानली जाते. यामागील प्रमुख कारण जर बघितले तर चांदीचा वापर दाग दागिने बनवण्यापेक्षा औद्योगिक कारणांसाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे साहजिकच बाजारातील चढउतारांचा चांदीवर लगेच परिणाम दिसायला लागतो. तज्ञांच्या मते सध्या चांदीमध्ये जी काही तेजी आलेली आहे त्यानंतर काही महिन्यात चांदीच्या दरांचा हा आलेख घसरण्याची शक्यता आहे. जागतिक पातळीवर चांदीची किंमत प्रति औंस चाळीस डॉलरच्या जवळपास स्थिर होईल असा अंदाज तज्ञ व्यक्त करत आहेत. तसेच जागतिक पातळीवर दिसून येणारी भू-राजकीय अस्थिरता सोने-चांदीच्या किमतींवर मोठा परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे. सध्या औद्योगिक कारणांसाठी चांदीची मागणी संपूर्ण जगात वाढताना दिसून येत आहे व त्या तुलनेत मात्र पुरवठा कमी आहे. याचा परिणाम इंडोनेशिया आणि चिली सारख्या देशातील खाणींवर दिसून येत आहे व त्यामुळे त्या ठिकाणी देखील आता चांदीला पर्याय शोधण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये जर या प्रयत्नांना यश आले तर चांदीची औद्योगिक मागणी घटण्याची शक्यता आहे व परिणामी चांदीचे दर मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकतात असे तज्ञांचे मत आहे. सध्या जर आपण बघितले तर बरेच गुंतवणूकदार त्यांच्या एकूण गुंतवणूक पोर्टफोलिओपैकी 20 ते 30 टक्के रकमेची चांदीत गुंतवणूक करत आहेत. म्हणजेच अगोदर जो काही गुंतवणुकीचा दहा ते पंधरा टक्क्यांचा आकडा होता त्याच्यापेक्षा आता चांदीत गुंतवणूक वाढल्याचे दिसून येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe