पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! आता ‘या’ भागात पण सुरू होणार मेट्रो, तयार होणार 42 किलोमीटर लांबीचा नवा मार्ग

Published on -

Pune News : राज्यातील अनेक प्रमुख शहरात मेट्रो सुरू करण्यात आली आहे. पुण्यात देखील गेल्या काही वर्षांपासून मेट्रोची सेवा उपलब्ध आहे. यामुळे सर्वसामान्य पुणेकरांना जलद प्रवासाचा अनुभव मिळतोय. सद्यस्थितीला पुण्यातील पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर मेट्रो धावत आहे.

येत्या काही महिन्यांनी शिवाजीनगर – हिंजवडी मार्गावर सुद्धा मेट्रो धावणार आहे. हा शहरातील मेट्रोचा तिसरा मार्ग राहणार असून याचे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून हाती घेण्यात आले आहे.

हा प्रकल्प शहरातील पहिला असा प्रकल्प आहे जो की पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्त्वावर तयार होतोय. आतापर्यंत सदर प्रकल्पाचे 87% काम पूर्ण झाले आहे तसेच उर्वरित कामही युद्ध पातळीवर सुरू आहे. दरम्यान आता पुण्यातील आणखी काही महत्त्वाचे भाग मेट्रो मार्गाने जोडले जाणार आहेत.

पिंपरी-चिंचवड परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी मेट्रोचे जाळे आणखी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आता थेट चाकण एमआयडीसीमधून मेट्रो धावणार आहे. या नव्या मेट्रो मार्गाची लांबी 42 किलोमीटर असेल.

भक्ती शक्ती चौकातून सुरू होणारा हा नवा मेट्रो मार्ग मुकाई चौक, भूमकर चौक, भुजबळ चौक, पिंपळे सौदागर, नाशिक फाटा, वल्लभनगर, टाटा मोटर्स, तळवडे एमआयडीसी, चाकण एमआयडीसी मार्गे चाकण शहरापर्यंत पोहोचणार आहे.

पण या प्रस्तावित मार्गावर काही बदल होण्याची शक्यता आहे. या मेट्रोमार्गाबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत होईल. यासाठी बैठकीचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे.

यामुळे लवकरच या मेट्रो प्रकल्पाचा मार्ग मोकळा होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच या मार्गाचा सविस्तर आढावा घेतला. हिंजवडी आयटी पार्क, चाकण एमआयडीसी आणि तळवडे औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे.

प्रवासाचा वेळ वाचवून जलद, सुरक्षित आणि आरामदायक प्रवास सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच या मार्गामुळे रस्त्यांवरील ताण कमी होऊन वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर घटेल, असे अधिकाऱ्यांचे मत आहे.

अजित पवार यांनी सोशल मीडियावर या प्रकल्पाशी संबंधित बैठकीची माहिती देताना, मेट्रो लाइन विकासाच्या विविध विषयांवर महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचे सांगितले. महाव्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनीही हा प्रकल्प लवकरच सुरू होणार असून, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रवाशांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होतील, असे स्पष्ट केले.

या प्रकल्पामुळे फक्त प्रवाशांचा मौल्यवान वेळ वाचणार नाही तर अतिरिक्त वाहनांच्या वापरामुळे होणारे प्रदूषणही कमी होईल. त्यामुळे पर्यावरणालाही दिलासा मिळेल. प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठीचा कालावधी व नेमकी सुरुवात लवकरच अधिकृतपणे जाहीर करण्यात येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News