Maharashtra New Bus Station : सध्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. राज्यातही नागरिकांमध्ये नवरात्र उत्सवामुळे अगदीच आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज राज्य शासनाने सर्वसामान्य नागरिकांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक संपन्न झाली असून या बैठकीत एकूण आठ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. फडणवीस सरकारने बोलावलेल्या या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्रातील अकोला शहरातील बसस्थानकासाठी जागा देण्यात आली आहे.

बस स्थानक, भाजी बाजार आणि वाणिज्य संकुलासाठी आवश्यक जागा महापालिकेला हस्तांतरित करण्यास आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त राज्य मंत्रिमंडळाचे बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून आज आपण याच निर्णयांची माहिती पाहणार आहोत.
राज्य मंत्रिमंडळाचे प्रमुख निर्णय
महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध विभागांशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. महसूल विभागाने वसई विरार शहर महानगरपालिकेस आचोळे (ता. वसई, जि. पालघर) येथे मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलसाठी जमीन उपलब्ध करून देण्यास मंजुरी दिली.
तसेच, नाशिकरोड येथील महाराष्ट्र साहित्य परिषद शाखेला मौजे देवळालीतील १०५५.२५ चौ.मी. जमीन देण्यास मान्यता दिली. याशिवाय अकोला शहरातील बस स्थानक, भाजी बाजार आणि वाणिज्य संकुलासाठी २४ हजार ५७९.८२ चौ.मी. जागा महापालिकेला हस्तांतरित करण्याचा निर्णय झाला.
गृह विभागाने घाटकोपर येथे बेकायदेशीर फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेवरील चौकशी समितीचा अहवाल स्वीकारला असून, शिफारशींवर एका महिन्यात कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून मुंबईतील अंधेरी येथील सरदार वल्लभभाई पटेल नगर (एसव्हीपी नगर) येथे सामूहिक पुनर्विकास प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. या प्रकल्पात १२२ संस्था व ३०७ वैयक्तिक भुखंडावरील एकूण ४,९७३ सदनिकांचा पुनर्विकास होणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील कुंभारी येथे महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या घरांसाठी मुद्रांक व नोंदणी शुल्कात सवलत देण्यात आली.
आरोग्य विभागाच्या निर्णयानुसार, शासकीय रुग्णालयांच्या सक्षमीकरणासाठी राज्य आरोग्य हमी सोसायटीला राखीव निधी उपलब्ध करून दिला जाईल. विस्तारित महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत – जन आरोग्य योजनेतून रुग्णांच्या उपचाराच्या दाव्यातून मिळणारा निधी रुग्णालयांसाठी वापरता येणार आहे.
परिवहन विभागाने नागपूर-नागभीड रेल्वेच्या १९६.१५ कि.मी. नॅरोगेज मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यासाठी ४९१ कोटी ५ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता दिली आहे.