Maharashtra New Dam : राज्याला लवकरच एका नव्या धरणाची भेट मिळणार आहे. राज्यातील हे नवीन धरण मुंबईकरांची तहान भागवणार आहे. राजधानी मुंबईतील नागरिकांना येत्या काळात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.
शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे यामुळे साहजिकच येत्या काळात येथील नागरिकांना पाणीटंचाईची समस्या त्रास देऊ शकते. दरम्यान याच समस्येवर आता एक रामबाण उपाय पुढ आला आहे.

मुंबईकरांसाठी आता पालघर जिल्ह्यात नवीन धरण तयार करण्यात येणार आहे. राज्य सरकारने घनदाट जंगलातून वाहणाऱ्या गारगाई नदीवर धरण तयार करण्याचा निर्णय घेतला असून या प्रकल्पाला गती देण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबईला सध्या सात धरणांमधून पाणीपुरवठा होतोय. तानसा, भातसा, वैतरणा व मोडकसागर अशा प्रमुख धरणांतून मुंबई शहराला पाणीपुरवठा मिळतोय. पण येत्या काळात शहरातील लोकसंख्या वाढणार आहे.
यामुळे अतिरिक्त पाण्याची आवश्यकता भासणार आहे. शहराला दररोज जवळपास 4000 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतोय. पण येत्या काही वर्षांत पाण्याची गरज वाढणार आहे.
त्यासाठी मुंबई महापालिकेने गारगाई धरण प्रकल्प हाती घेतला आहे. यास राज्य शासनाकडून परवानगी मिळालेली असून केंद्र सरकारच्या वनखात्याकडून काही परवानग्या बाकी आहेत.
वनपरवानग्या मिळाल्यानंतर तातडीने निविदा काढण्याचे आदेश नगरविकास मंत्री आशिष शेलार यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना दिले आहेत.
गारगाई धरण पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात गारगाई नदीवर उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे वाडा तालुक्यातील ओगदा, तिळमाळ, खोडदे, फणसपाडा, पाचघर आणि घोडसाखरे या सहा गावांचे स्थलांतर होणार आहे.
त्यापैकी ओगदा व खोडदे गावांच्या जागेवर धरण प्रकल्प उभारला जाईल. यानंतरची जागा शिल्लक राहील तिथे वृक्ष लागवड करण्यात येईल.
हे प्रस्तावित धरण 69 मीटर उंच आणि 972 मीटर लांबीचे असणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर यातील पाणी मोडकसागर धरणात बोगद्याद्वारे वळवले जाईल. या प्रकल्पासाठी 1100 हेक्टर जमीन बाधित होणार आहे.