EPFO News : संघटित क्षेत्रातील प्रत्येक कर्मचाऱ्यांचे पीएफ अकाउंट असते. तुम्हीही एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये काम करत असाल तर तुमचेही पीएफ अकाउंट असेल. दरम्यान आता पीएफ अकाउंटधारकांसाठी लवकरच ईपीएफओ कडून मोठा निर्णय घेतला जाणार आहे.
पीएफ अकाउंट ईपीएफोद्वारे म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेद्वारे चालवले जाते. आता ही संघटना देशभरातील लाखों कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन सुविधा उपलब्ध करून देणार आहे.

आता पीएफ खात्यातील रक्कम कर्मचाऱ्यांना अगदीच सहजतेने काढता येणार आहे. ईपीएफओ कडून जानेवारी महिन्यापासून एक नवीन सुविधा उपलब्ध होणार असून या नव्या सुविधेमुळे आता ग्राहकांना पीएफ मधील पैसा एटीएम च्या माध्यमातून सुद्धा काढता येणार आहेत.
यासाठी कर्मचाऱ्यांना एक विशिष्ट एटीएम कार्ड पुरवले जाईल अशी माहिती देखील विश्वसनीय सूत्रांकडून समोर आली आहे. अर्थात पीएफ काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना विशेष एटीएम कार्ड असेल ज्याच्या मदतीने ते एका निश्चित लिमिट पर्यंतची रक्कम पीएफ अकाउंट मधून काढू शकणार आहेत.
नक्कीच या सुविधेमुळे लाखो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. ही सुविधा जानेवारी 2026 पासून प्रत्यक्षात सुरू होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ईपीएफओ कडून कर्मचाऱ्यांसाठी या नव्या प्रस्तावाला पुढील महिन्यात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
ईपीएफओ संदर्भातील निर्णय घेणारं मंडळ सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजची बैठक ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात होईल. या होऊ घातलेल्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची दाट शक्यता आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ईपीएफओचं आयटी इन्फ्रास्ट्रक्चर आता अशा प्रकारचे व्यवहार करण्यास पूर्णपणे सज्ज झाले आहे. पण अद्याप एटीएममधून काढण्यात येणाऱ्या रकमेच्या मर्यादेबाबत निर्णय झालेला नाही. लवकरच याबाबतही अंतिम निर्णय घेतला जाईल.
ईपीएफओचा एकूण फंड 28 लाख कोटी रुपयांहून अधिक आहे. ईपीएफओचे सात कोटी 80 लाख कर्मचारी सदस्य आहेत. आता या कर्मचाऱ्यांना गरजेच्या वेळी कर्ज काढावे लागू नये. पीएफ अकाउंट मधील त्यांचा पैसा गरजेच्या वेळी त्यांच्या कामी यावा यासाठी ही सुविधा आवश्यक आहे.
ज्यामुळं कर्मचाऱ्यांना त्यांच्या फंडातील रकमेचा वापर सहजपणे करता येणं शक्य होईल. दरम्यान, मंत्रालयाकडून ही नवी सुविधा लागू करण्यासाठी बँकांसोबत तसेच आरबीआय सोबत चर्चा करण्यात आली आहे. यामुळे येत्या काही महिन्यांनी प्रत्यक्षात ही सुविधा सुरू होईल अशी आशा आहे.