GST Rate : नव्याने कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर अलीकडे सरकारने जीएसटीमध्ये महत्त्वाचा बदल केला आहे. जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटीचे दोन स्लॅब रद्द केले आहेत.
12% आणि 28% हे जीएसटीचे दोन स्लॅब रद्द करण्यात आले आहेत. आता फक्त पाच टक्के आणि 18% हे दोनच स्लॅब आहेत. यासोबतच सरकारने अनेक वस्तूंवरील जीएसटी कमी केला आहे.

छोट्या कार्सवरील जीएसटी देखील 28 टक्क्यांवरून 18 टक्के करण्यात आला आहे. सेस सुद्धा कमी करण्यात आलाय. या निर्णयामुळे अनेक कंपन्यांच्या गाड्या स्वस्त झाल्या आहेत. ह्या कर कपातीचा थेट फायदा ग्राहकांना होतोय.
अनेक छोट्या कारच्या किंमती आता लक्षणीयरीत्या कमी झाल्या आहेत. यामध्ये मारुती सुझुकीने केलेली कपात विशेष खास आहे. गेल्या अनेक वर्षांपासून Alto K10 ही देशातील सर्वात स्वस्त कार म्हणून ओळखली जात होती.
पण आता जीएसटी कमी झाल्यानंतर हा किताब मारुती सुझुकीच्या S-Presso कडे गेला आहे. जीएसटी 2.0 लागू झाल्यानंतर कंपनीने या कारची किंमत घटवून केवळ 3.50 लाख रुपये केली आहे.
तर Alto K10 ची सुरुवातीची किंमत आता 3.70 लाख रुपये इतकी आहे. यामुळे पहिल्यांदाच Alto K10 पेक्षा S-Presso स्वस्त ठरली आहे. किंमत कमी होण्यामागे एक महत्त्वाचे कारण म्हणजे सेफ्टी फीचर्स.
सरकारने नुकताच नवीन कारसाठी 6 एअरबॅग्सचा नियम लागू केला आहे. त्यामुळे Alto K10 आणि Celerio सारख्या मॉडेल्समध्ये हे फीचर्स स्टॅंडर्ड स्वरूपात देण्यात आले आहेत. परिणामी, त्यांच्या किंमती तुलनेने वाढल्या आहेत.
दुसरीकडे, S-Presso मध्ये अद्याप 2 एअरबॅग्स दिल्या जात आहेत. हाच घटक तिच्या कमी किंमतीमागील मुख्य कारण मानला जातो. किंमत आणि सेफ्टी फीचर्स यामध्ये स्पष्ट तफावत असली तरी, कमी बजेटमध्ये कार घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी S-Presso हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
ऑटो तज्ज्ञांच्या मते, भारतात एंट्री-लेव्हल कार्सची मागणी अद्यापही प्रचंड आहे. आता S-Presso च्या किंमतीत कपात झाली असल्याने या गाडीची विक्री आणखी वाढणार आहे.