महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात उभारला जाणार जगातील सर्वात मोठा स्टील प्लांट ! 9,100 एकर जमिनीचे भूसंपादन होणार
Maharashtra News : गेल्या काही वर्षांमध्ये अनेक उद्योग राज्याबाहेर स्थलांतरित झालेत. यामुळे सरकारवर जबरदस्त टीका झाली किंबहुना अजूनही सुरूच आहे. राज्याबाहेर जाणारे बहुतांशी उद्योग गुजरात राज्यात स्थलांतरित झाले आहेत.

यामुळे सरकारच्या धोरणांवर विरोधकांकडून सतत ताशेरे ओढले जात आहेत. मात्र आता महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्रासाठी एक गुड न्यूज समोर येत आहे. ती म्हणजे महाराष्ट्रात आता जगातील सर्वाधिक मोठा स्टील प्लांट उभारण्यात येणार आहे. हा स्टील प्लांट विदर्भात तयार करण्यात येईल.
गडचिरोली जिल्ह्यात जीएसडब्ल्यू ग्रुप जगातील सर्वाधिक मोठा स्टील प्लांट उभारणार आहे. दरम्यान आता याच प्रकल्पाबाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) गडचिरोली जिल्ह्यात जेएसडब्ल्यू ग्रुपच्या जगातील सर्वात मोठ्या स्टील प्लांटसाठी लवकरच भूसंपादन करणार असल्याचे खात्रीलायक बातमी समोर आली आहे.
सदर प्राधिकरणाकडून जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी तब्बल 9 हजार 100 एकर जमीन संपादित करण्याची योजना आखण्यात आलीये. हा नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील आजवरचा सर्वात मोठा भूसंपादन प्रकल्प ठरणार आहे.
जेएसडब्ल्यू ग्रुपचे अध्यक्ष सज्जन जिंदाल यांनी यावर्षी फेब्रुवारी महिन्यात गडचिरोलीत एकात्मिक स्टील प्लांट स्थापन करण्याची घोषणा केली होती. यासाठी आधी तहसीलजवळील जागेचा विचार करण्यात आला होता; मात्र आता चामोशी तहसीलमधील पर्यायी जागा या प्रकल्पासाठी अधिक योग्य असल्याचे समोर आले आहे.
या जमिनीत खाजगी, वन आणि सरकारी मालकीचे भूखंड आहेत. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, खाजगी जमीन अधिग्रहण तुलनेने सोपे होईल. कारण, स्थानिक शेतकरी व जमिनमालक सरकारी दराने जमीन देण्यास तयार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नेमकी जागा कोणती हे एमआयडीसीने अद्याप जाहीर केलेले नाही. या प्रस्तावाला अंतिम मान्यता देणे हे कंपनीवर अवलंबून आहे. जेएसडब्ल्यू ग्रुपने सहमती दर्शवल्यानंतर, एमआयडीसी त्यांच्या वतीने जमीन संपादित करेल.
चामोशी तालुक्यात लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचा स्टील प्लांट आधीपासून कार्यरत आहे. जिंदाल यांनी नागपुरातील कार्यक्रमात जाहीर केले होते की, गडचिरोलीतील या प्रकल्पाची वार्षिक उत्पादन क्षमता २५ दशलक्ष टन असेल.
एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असलेला हा प्रकल्प राज्याला लोखंड आणि पोलाद उद्योगाचे नवे केंद्र म्हणून ओळख मिळवून देईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.