Rule Change : अलीकडेच केंद्रातील मोदी सरकारने सर्वसामान्यांना दिलासा म्हणून जीएसटी च्या रेटमध्ये कपात केली आहे. सरकारने अनेक वस्तूंवरील जीएसटी कमी केला आहे. यामुळे सर्वसामान्यांना सणासुदीच्या हंगामात मोठा दिलासा मिळाला आहे.
अशातच आता देशभरातील सर्वसामान्य जनतेसाठी आणखी एक मोठी कामाची बातमी समोर आली आहे. ऑक्टोबर महिन्यात सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडित काही महत्त्वाचे बदल होणार आहेत. 1 ऑक्टोबरपासून या नव्या नियमांची अंमलबजावणी सुरू होणार आहे.

या नव्या नियमांनुसार रेल्वे प्रवास, पेंशन खाते, डिजिटल पेमेंट्स आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतींवर याचा थेट परिणाम दिसून येणार आहे. आता आपण पुढील महिन्यात नेमके कोणकोणते बदल होणार याबाबत माहिती पाहणार आहोत.
रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. एक ऑक्टोबर पासून तिकीट बुकिंग बाबतचा नवा नियम लागू होणार आहे. ऑनलाइन तिकीट बुकिंगमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी हा नियम लागू करण्यात येणार आहे.
नव्या नियमानुसार आता आरक्षण सुरू झाल्यानंतर पहिल्या 15 मिनिटांत फक्त आधार कार्ड व्हेरिफाइड प्रवासीच IRCTC वेबसाइट आणि अॅपद्वारे तिकीट बुक करू शकणार आहेत.
हा नियम यापूर्वी केवळ ‘तत्काळ बुकिंग’साठी लागू होता, पण आता सर्वसाधारण आरक्षणातही लागू होणार आहे. त्याचवेळी रेल्वे काउंटरवरून तिकीट घेणाऱ्यांसाठी कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
पेंशनधारकांसाठी देखील ऑक्टोबर महिन्यात नवीन नियम लागू होणार आहे. पेंशन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) ने शुल्कांमध्ये बदल केला आहे.
आता नवीन PRAN उघडताना ई-PRAN किटसाठी 18 रुपये आणि फिजिकल कार्डसाठी 40 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. तसेच वार्षिक मेंटेनन्स चार्ज प्रति खाते 100 रुपये निश्चित करण्यात आला आहे. हा नियम एक ऑक्टोबर पासून लागू होण्याची शक्यता आहे.
UPI ने पेमेंट करणाऱ्यांसाठी सुद्धा महत्त्वाची बातमी आहे. डिजिटल व्यवहारांमध्ये पुढील महिन्यापासून मोठा बदल होणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने सुरक्षेसाठी पीअर-टू-पीअर (P2P) व्यवहारांवर मर्यादा आणण्याचे संकेत दिले आहेत.
यामुळे Google Pay, PhonePe किंवा Paytm सारख्या अॅप्सद्वारे थेट व्यक्ती ते व्यक्ती होणाऱ्या व्यवहारांवर काही निर्बंध आणले जाऊ शकतात. ऑक्टोबर मध्ये याबाबतचा निर्णय होणे अपेक्षित आहे.
घरगुती तसेच व्यावसायिक एलपीजी गॅसच्या किमतीत सुद्धा पुढील महिन्यात बदल होणार आहे. खरे तर एप्रिल महिन्यापासून गॅसच्या किमती स्थिर आहे. व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल होतोय पण 14 किलोच्या गॅसच्या किमती गेल्या काही महिन्यांपासून तशाच आहेत. पण आता पुढील महिन्यात यात बदल होण्याची शक्यता आहे.
यामुळे ऑक्टोबर महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती कमी होणार की वाढणार हे पाहण्यासारखे आहे. महत्वाची बाब म्हणजे दर महिन्याच्या पहिल्या दिवशी किमती बदलतात यामुळे 1 ऑक्टोबर रोजीचं गॅस सिलेंडरच्या किमती बदलणार आहेत.













