Gold Investment:- भारतामध्ये सोन्याची खरेदी करण्याची परंपरा ही खूप आधीपासून असून लग्नकार्य असो किंवा सणासुधीचा कालावधी असो यात सोने-चांदीची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जाते. परंतु सध्या जर सोने आणि चांदीचे दर बघितले तर ते गगनाला पोहोचले असल्याने बऱ्याच जणांना इच्छा असून देखील आर्थिक दृष्टिकोनातून सोने-चांदीची खरेदी अशक्य झाल्याचे दिसून येत आहे.
त्यातल्या त्यात आता गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून देखील सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जाते. परंतु वाढत्या किमती आता सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी मोठा अडसर ठरत आहे. याप्रमाणेच तुम्हाला देखील सोन्याची खरेदी करायचे असेल आणि तुमच्याकडे पैसे कमी असतील तर चिंता करण्याची गरज नाही. कारण या लेखात आपण असे गुंतवणुकीचे पर्याय बघणार आहोत ज्या माध्यमातून तुम्ही कमी किमतीत देखील सोन्यात गुंतवणूक करू शकतात.

सोन्यात गुंतवणूक करण्याचे उत्तम पर्याय
1- गोल्ड ईटीएफ- गोल्ड ईटीएफ बाजारामध्ये ट्रेड होणारे फंड असून यामध्ये तुम्ही युनिटच्या स्वरूपात सोन्याची खरेदी करू शकतात. साध्या भाषेत सांगायचे म्हटले म्हणजे याच्यातील प्रत्येक युनिट हा एक ग्रॅम सोन्याच्या मूल्याइतका असतो. जर या माध्यमातून तुम्ही सोन्यात गुंतवणूक केली तर सोन्याची शुद्धता किंवा ते ठेवण्याची चिंता तुम्हाला भासत नाही. तुम्ही अगदी कमी रकमेपासून यात गुंतवणूक सुरू करू शकतात. महत्वाचे म्हणजे यासाठी तुम्हाला फक्त डिमॅट खाते गरजेचे असते.
2- सॉवरेन गोल्ड बॉण्ड- सोन्यात गुंतवणुकीसाठी हा देखील एक पर्याय उत्तम असून भारत सरकारकडून हमी असलेला हा पर्याय खूपच सुरक्षित आहे. तुम्हाला जर दीर्घ कालावधीसाठी सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर हा पर्याय तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरेल. तुम्ही या माध्यमातून एक ग्रॅम पासून सोन्यात गुंतवणूक करू शकतात व यावर तुम्हाला वर्षाला 2.5 टक्के व्याज देखील दिले जाते. फक्त यामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी लक्षात घ्यावे की या तुम्ही एकदा गुंतवणूक केली तर पाच वर्षांपूर्वी तुम्हाला पैसे काढता येत नाहीत. हवे असेल तर तुम्ही स्टॉक एक्सचेंज वर हे बॉण्ड विक्री करू शकता.
3- डिजिटल गोल्ड- हा देखील सोन्यात गुंतवणूक करण्याचा एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म असून यामध्ये तुम्ही दहा रुपयापासून गुंतवणुकीला सुरुवात करू शकतात. यामध्ये सोने सुरक्षित वॉल्टमध्ये ठेवले जाते आणि त्याचा मालकी हक्क तुमच्याकडे असतो. भविष्यामध्ये तुम्ही दागिने, सोन्याचे बार किंवा नाणी यामध्ये ते रूपांतरित करू शकतात व त्याची थेट तुम्हाला विक्री देखील करता येते.
4- गोल्ड म्युच्युअल फंड- सोन्यात गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड हा एक उत्तम पर्याय असून हे फंड तुमच्यासाठी गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करतात आणि तुम्ही एसआयपीच्या माध्यमातून फक्त पाचशे रुपयापासून यात गुंतवणुकीला सुरुवात करू शकतात.