Pune News : राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाची कामे पूर्ण झाली आहेत. यामुळे राज्यात उत्तम कनेक्टिव्हिटी तयार झाली असून अजूनही प्रशासनाच्या माध्यमातून अनेक प्रकल्पांची कामे सुरू आहेत. पुण्यातही अनेक मोठमोठे रस्ते विकासाची कामें प्रगतीपथावर आहेत.
तसेच काही प्रकल्पांची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. दरम्यान अशाच एका महत्त्वाकांक्षी प्रस्तावित रस्ते विकासाच्या प्रकल्पाबाबत एक नवं अपडेट हाती आलं आहे.

खरेतर राज्य पायाभूत सुविधा महामंडळाने पुणे-छत्रपती संभाजीनगर शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग व सध्याच्या महामार्गाच्या सुधारणेचे काम हाती घेतले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पुणे-शिरुर उन्नत रस्त्याचे बांधकाम करण्यात येणार आहे.
दरम्यान या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सोमवारी तांत्रिक निविदा खुल्या करण्यात आल्या असून यात 3 कंपन्यांकडून निविदा सादर झाल्या आहेत. अदानी एन्टरप्रायझेस लिमिटेड, वेल्सपून एन्टरप्रायझेस लिमिटेड व जीआर इन्फ्राप्रोजेक्ट लिमिटेड यांचा यात समावेश आहे.
सहा मार्गिकेच्या या उन्नत रस्त्याचा खर्च तब्बल 7515 कोटी रुपये आहे. हा मार्ग बिल्ड ऑपरेट अँड ट्रान्सफर या तत्त्वावर उभारला जाईल. तसेच प्रकल्पाच्या खर्चाची वसुली करण्यासाठी या महामार्गावर पथकर आकारला जाणार आहे.
केंद्रीय भूपृष्ठ व महामार्ग मंत्रालयाच्या पथकर धोरणानुसार पथकराची अंमलबजावणी केली जाईल. याआधी हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारित होता.
पण गेल्या वर्षी तो एमएसआयडीसीकडे वर्ग करण्यात आला. उन्नत रस्त्याचा पहिला टप्पा 54 किलोमीटर लांबीच्या पुणे-शिरुर मार्गावर राबविला जाणार आहे. एमएसआयडीसीने काही महिन्यांपूर्वी निविदा प्रक्रिया सुरू केली होती.
त्यास चांगला प्रतिसाद मिळाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तांत्रिक निविदांची छाननी पूर्ण झाल्यानंतर आर्थिक निविदा खुल्या होतील आणि कोणत्या कंपनीला काम मिळणार यावर अंतिम शिक्कामोर्तब होईल.
या रस्त्याचे काम वर्क ऑर्डर नंतर चार वर्षात पूर्ण करावे लागेल. याचे काम 2030 पर्यंत पूर्ण होणार असून पुणे-संभाजीनगर प्रवास सुपरफास्ट होईल.
एमएसआयडीसीने निविदा अंतिम करण्याची प्रक्रिया गतीमान केली असून शक्य तितक्या लवकर प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्याचे नियोजन आहे. तीन नामांकित कंपन्यांमधील ही शर्यत आता नेमक कोण जिंकत याकडे पायाभूत क्षेत्रातील तज्ज्ञांचे लक्ष लागले आहे.