Gold Price : भारतात गुंतवणुकीचे अनेक ऑप्शन आहेत. शेअर मार्केट म्युच्युअल फंड सोने, चांदी रिअल इस्टेट अशा अनेक ठिकाणी गुंतवणूकदार आपल्या सोयीने आणि आवडीने गुंतवणूक करत असतात. अधिकचे रिटर्न मिळावेत यासाठी अनेकजण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात. पण शेअर मार्केट सारखाच परतावा सोन्यामधूनही मिळू लागला आहे.
सोन्याच्या किंमतींनी मागील अडीच दशकात ऐतिहासिक उसळी घेतली आहे. यामुळे गुंतवणूकदारांना प्रचंड नफा मिळाला आहे. गेल्या पंचवीस वर्षांच्या काळात सोन्याने एका लाखाचे 27 लाख रुपये बनवले आहेत. रिपोर्टनुसार 2000 मध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 4400 रुपये प्रति तोळा एवढी होती.

पण आज सोन्याची किंमत तोळा मागे एक लाख वीस हजार रुपये एवढी आहे. अर्थात गेल्या 25 वर्षांच्या काळात सोन्याच्या किमतीत 2600 टक्क्यांची घसघशीत वाढ झाली असून यामुळे सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना या काळात प्रचंड नफा मिळाला आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे 2000 पासून 2004 पर्यंत सोन्याच्या किमतीत फारशी वाढ झालेली नव्हती. पण 2008 च्या जागतिक आर्थिक मंदीनंतर खऱ्या अर्थाने ह्या मौल्यवान धातूच्या किमतीत मोठी वाढ झाली. जगभरातील आर्थिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित गुंतवणूकीचे साधन म्हणून गुंतवणूकदारांनी सोन्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली.
आजही सेफ हेवन म्हणून सोन्याकडे पाहिले जाते. जागतिक मंदीनंतर कोरोना काळातही गुंतवणूकदारांनी सोन्यावर विश्वास दाखवला आणि यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. रशिया – युक्रेन, इराण – इराक, भारत पाकिस्तान या उभय देशांमधील तणावा दरम्यानही अनेक गुंतवणूकदारांनी सोन्यावरच विश्वास कायम ठेवला.
भूराजकीय तणावाव्यतिरिक्त जगभरातील देशातील मध्यवर्ती बँकांनी आता सोन्याचा साठा वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामुळे सोन्याच्या किमती सतत वाढत आहेत. दरम्यान एखाद्या गुंतवणूकदाराने जर 2000 मध्ये एक लाख रुपयांचे सोने घेतले असते तर त्या सोन्याचे मुले आज 27.26 लाख रुपये एवढे झाले असते.
त्या काळात एक लाख रुपयात 22.72 तोळे सोने मिळाले असते. अर्थात पंचवीस वर्षांमध्ये गुंतवणूकदारांचा पैसा तब्बल 27 पट वाढला असता. खरेतर, सोन्याच्या वाढत्या किमतीमागे अनेक कारणे आहेत.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे रुपया–डॉलर विनिमय दर. अर्थातच रुपया कमकुवत झाला की सोने महाग होते. याशिवाय, आंतरराष्ट्रीय बाजारातील दर, आयात शुल्क, सरकारी कर धोरणे यांचाही सोन्याच्या किमतीवर थेट परिणाम झाला आहे.