RBI MPC Meeting : केंद्रातील सरकारने अलीकडेच जीएसटी 2.0 ची सुरवात केली आहे. जीएसटीच्या नव्या धोरणात अनेक वस्तूंवरील जीएसटी कमी करण्यात आला आहे.
त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार अशी आशा व्यक्त केली जात आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून आरबीआय पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये कपात करून सर्वसामान्यांना आणखी एक मोठा दिलासा देणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या.

पण रेपो रेटमध्ये आरबीआयने कपात केलेली नाही. आज सकाळी 10 वाजता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी मौद्रिक धोरण जाहीर केले. या जाहीर केलेल्या द्वैमासिक मौद्रिक धोरणात कर्जदारांना दिलासा मिळालाय.
रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरण समितीने रेपो रेट तसाच कायम ठेवला आहे. रेपो दर 5.5 टक्क्यांवर स्थिर ठेवण्याचा निर्णय झालाय. खरेतर, या वित्त वर्षातील ही चौथी बैठक होती. याची घोषणा गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी केली आहे.
जागतिक स्तरावरील आव्हानांनंतरही चांगला पाऊस व स्थिर आर्थिक घटकांमुळे भारताच्या पहिल्या तिमाहीतील वाढीचा दर अपेक्षेपेक्षा जास्त राहिला अशी ही माहिती यावेळी देण्यात आली.
रेपो रेट हा एमपीसीमधील सर्व सदस्यांच्या संमतीने ठरविण्यात आला आहे. आता या निर्णयामुळे होम लोन, वैयक्तिक लोन, कार लोनवरील व्याजदरात कोणताही बदल होणार नाहीये.
खरे तर गेल्या काही महिन्यांत रेपो रेट मध्ये मोठी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे आज यात वाढ होणार की काय अशी भीती सर्वसामान्यांना होती.
पण गेल्या तीन दिवसांपासून सुरू असणाऱ्या पतधोरण बैठकीत आज रेपो रेट कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या एका वर्षात रेपो रेटमध्ये आरबीआयने तब्बल तीन वेळा मोठी कपात केली आहे.
यामुळे रेपो रेट 100 बेसिस पॉईंटने म्हणजेच एक टक्क्यांनी कमी झाला आहे. खरंतर रेपो रेट वरून कर्जाचे व्याजदर ठरवले जात असते.
यामुळे रेपो रेट मध्ये वाढ झाली की कर्जाचा हप्ता वाढतो आणि जर यामध्ये कपात करण्यात आली तर कर्जाचा हप्ता सुद्धा कमी होत असतो.