Share Market : तुम्ही येत्या काळात तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये काही बँकिंग शेअर्स ऍड करणार आहात का मग तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे. नव्याने बँकिंग शेअर्स खरेदी करणाऱ्यांसाठी आज आम्ही कामाची माहिती घेऊन आलो आहोत. खरंतर मागील काही महिन्यांपासून शेअर मार्केटमध्ये सातत्याने चढ-उतार सुरू आहेत.
भू – राजकीय तणावांमुळे तसेच अमेरिकेच्या नव्या व्यापारी धोरणांमुळे गुंतवणूकदारांमध्ये मोठी अस्वस्थता दिसून येत आहे. मात्र असे असले तरी या काळात सुद्धा काही बँकांचे शेअर्स प्रचंड वाढत आहेत. कॅनरा बँकेच्या शेअर्समध्ये देखील गेल्या काही महिन्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

अशातच, आता याच शेअर्स संदर्भात मोठे अपडेट समोर आले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील केनरा बँकेचे शेअर्स सोमवारी बीएसईवर 52 आठवड्यांच्या नव्या उच्चांकावर पोहोचले. बँकेचा शेअर 127.65 रुपयांपर्यंत गेला असून, गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले आहे.
रेखा झुनझुनवाला यांनी या बँकेत आपला हिस्सा आणखी वाढवला आहे. केनरा बँकेतील त्यांची हिस्सेदारी 1.46 टक्क्यांवरून 1.57 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. त्यांच्या नावावर आता 14,24,43,000 शेअर्स असून, जून 2025 तिमाहीत हा आकडा 13.24 कोटी शेअर्स इतका होता.
या वाढलेल्या गुंतवणुकीमुळे केनरा बँकेवरील बाजाराचा विश्वास आणखी बळकट झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) हिचाही केनरा बँकेत मोठा हिस्सा आहे. एलआयसीकडे बँकेचे 47,01,07,468 शेअर्स असून तिची हिस्सेदारी 5.18 टक्के आहे.
सप्टेंबर 2025 पर्यंतचा हा अधिकृत शेअरहोल्डिंग डेटा समोर आला आहे. शेअरच्या कामगिरीकडे पाहता, केनरा बँकेचे शेअर्स गेल्या पाच वर्षांत तब्बल 587 टक्क्यांनी वधारले आहेत. 2020 मध्ये हा शेअर 18.49 रुपये इतका होता. पण आज हा स्टॉक 127.65 रुपयांवर व्यवहार करतोय.
मागील चार वर्षांत या स्टॉकने 260% रिटर्न दिले आहेत. तीन वर्षांत 178 टक्क्यांचा परतावा मिळालाय. तसेच गेल्या दोन वर्षांत या शेअरच्या किमतीत 70% ची वाढ झालीये. फक्त गेल्या सहा महिन्यांत 47 टक्क्यांनी आणि मागील एका महिन्यात 18 टक्क्यांनी शेअर्स वाढले आहेत.
सध्या बँकेचा 52 आठवड्यांचा नीचांक 78.58 रुपये इतका आहे. तज्ज्ञांच्या मते, बँकेच्या मजबूत आर्थिक स्थितीमुळे आणि गुंतवणूकदारांच्या वाढत्या विश्वासामुळे केनरा बँकेचा शेअर आणखी तेजी दाखवू शकतो.