7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीच्या आधी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवण्याची मोठी घोषणा केली होती. सरकारच्या या निर्णयानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55% वरून 58% झाला.
दरम्यान आता केंद्र पाठोपाठ विविध राज्यांमधील सरकारांकडून त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढीची घोषणा होत आहे. अलीकडेच येत्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बिहार राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी नितीश कुमार सरकारने महागाई भत्ता वाढीचा निर्णय घेतला होता.

दरम्यान आता अरुणाचल प्रदेश मधील राज्य कर्मचाऱ्यांसाठी देखील तेथील सरकारने महागाई भत्ता वाढीचा एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी या निर्णयाची माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या माहितीनुसार अरुणाचल प्रदेश राज्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा व पेन्शन धारकांचा महागाई भत्ता आता तीन टक्क्यांनी वाढला आहे. आतापर्यंत या नोकरदार मंडळीला 55 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात होता.
परंतु ऑगस्ट महिन्यापासून या कर्मचाऱ्यांना 58% दराने महागाई भत्ता दिला जाणार आहे. याचा रोख लाभ ऑक्टोबर महिन्याच्या पगारांसोबत मिळणार असला तरीही हा भत्ता जुलै महिन्यापासून लागू राहणार आहे. अर्थात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना व पेन्शन धारकांना जुलै ऑगस्ट व सप्टेंबर या तीन महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा मिळणार आहे.
नक्कीच अरुणाचल प्रदेश राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय तेथील राज्य कर्मचाऱ्यांसाठी व पेन्शन धारकांसाठी मोठा दिलासाचा राहणार असून दिवाळीच्या आधीच या लोकांची दिवाळी झाली आहे असे आपण या निमित्ताने म्हणू शकतो.
या निर्णयाचा कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार असून संबंधित निर्णयाचे कर्मचाऱ्यांकडून तसेच पेन्शन धारकांकडून स्वागत करण्यात आले आहे. केंद्रीय सरकारने सातवा वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांचा व पेन्शनधारकांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवला आहे.
ही वाढ जुलै महिन्यापासून लागू झाली आहे. यासोबतच केंद्रातील सरकारने पाचवा वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आठ टक्क्यांनी व सहावा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पाच टक्क्यांनी वाढवला आहे.
दरम्यान आता केंद्रानंतर विविध राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला जातोय. येत्या काही दिवसांनी आपल्या महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकांचा महागाई भत्ता सुद्धा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर 58% केला जाणार आहे. सध्या राज्य कर्मचाऱ्यांना 55 टक्के दराने याचा लाभ मिळतोय.