Pm Kisan Yojana : राज्यासह देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. Pm मोदी यांच्या महत्वाकांक्षी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत येणारा २१ वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना दिला जाईल. नोव्हेंबर २०२५ च्या पहिल्या आठवड्यात हा लाभ मिळण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.
छठ पूजनंतर हा हप्ता कधीही जारी होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पण अद्याप केंद्र सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली नाही. या योजनेअंतर्गत, पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० ची मदत दिली जाते. ही मदत तीन समान हप्त्यांमध्ये मिळते. अर्थातच प्रत्येकी २,००० चा एक हफ्ता या पद्धतीने ही मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.

आतापर्यंत सरकारने २० हप्ते वितरित केले असून, देशभरातील ११ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला आहे. आता अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार पुढील हफ्त्याची देयक प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे. आधी हा हप्ता दिवाळीपूर्वी देण्याची शक्यता वर्तवली गेली होती, मात्र प्रशासनिक कारणांमुळे तो नोव्हेंबरच्या सुरुवातीला वितरित करण्याची योजना तयार करण्यात आली आहे.
दरम्यान, ई-केवायसी पूर्ण करणे सर्व लाभार्थ्यांसाठी अनिवार्य करण्यात आले आहे. पारदर्शकता राखण्यासाठी आणि फसवणूक रोखण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. ज्यांच्या बँक खात्यांशी आधार क्रमांक जोडलेले आहेत आणि ई-केवायसी पूर्ण झाले आहे, अशा शेतकऱ्यांनाच हप्ता मिळणार आहे. प्रलंबित ई-केवायसी असलेल्या लाभार्थ्यांचे पेमेंट रोखले जाऊ शकते.
शेतकरी pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ई-केवायसी ऑनलाइन करू शकतात. यासाठी होमपेजवरील ‘ई-केवायसी’ पर्याय निवडून आधार क्रमांक टाकावा, त्यानंतर नोंदणीकृत मोबाइलवर आलेला ओटीपी प्रविष्ट करावा. पडताळणीनंतर प्रक्रिया पूर्ण होते. तसेच, कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) वरही शेतकऱ्यांना ऑफलाइन मदत मिळू शकते.
सरकारकडून अधिकृत तारीख जाहीर होताच शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल, अशी अपेक्षा आहे. देशातील कोट्यवधी शेतकरी सध्या या निधीची आतुरतेने वाट पाहत आहेत.













