RBI Banking Rules : आपल्या संसाराच्या गरजा भागवण्यासाठी आपण अनेकदा बँकांकडून कर्ज काढतो. घर घेण्यासाठी, नवीन गाडी घेण्यासाठी कर्ज काढले जाते. खरेतर आधी कर्ज घेणे फारच वाईट समजले जात असे पण आता कर्ज घेणे तितके वाईट समजले जात नाही. पैसे नसले की आपण थेट बँकेत जातो आणि आपल्या पैशांची गरज भागवतो. पण कर्ज घेताना आपल्याला गॅरंटर शोधावा लागतो.
आपले मित्र देखील कर्ज घेत असतील तर आपल्याला गॅरेंटर होण्यास सांगतात. नातेवाईकांकडून तसेच मित्रांकडून कर्जासाठी गॅरेंटर बना अशी मागणी केली जाते. अनेकदा आपण मदत होईल म्हणून त्यांची मागणी मान्य सुद्धा करतो.

पण, कोणत्याही प्रकारच्या कर्जासाठी गॅरेंटर होण्याआधी तुम्हाला काही नियमांची माहिती असणे आवश्यक आहे. आजच्या काळात अनेकदा मित्र नातेवाईक किंवा ऑफिसमधील सहकारी आपल्याला त्यांच्या कर्जासाठी गॅरेंटर म्हणून सही करण्याची विनंती करतात पण ही एक छोटी वाटणारी सही भविष्यात तुमच्या आयुष्यात मोठे वादळ आणू शकते.
मित्रासाठी किंवा नातेवाईकासाठी केलेली एक छोटीशी मदत भविष्यात तुमच्यासाठी मोठं खड्डे तयार करू शकते. खरेतर, बँक वित्तीय संस्था जेव्हा कोणालाही कर्ज देते तेव्हा त्या कर्जदाराने ठरलेल्या वेळेत पैसे फेडले नाही तर जो व्यक्ती गॅरेंटर बनलेला असतो त्यावर पूर्ण जबाबदारी येते.
म्हणजेच कर्जदारांनी परतफेड केली नाही तर बँक थेट गॅरेंटर बनलेल्या व्यक्तीकडून कर्जाची रक्कम वसूल करते. यामुळे तुमचा मित्र किंवा नातेवाईक कर्ज काढताना तुम्हाला गॅरेंटर बनण्यास सांगत असेल तर तुम्ही आधी या नियमांच भान ठेवणे आवश्यक आहे.
जर तुम्ही कोणाच्या कर्जासाठी गॅरेंटर म्हणून सही केली आणि त्या व्यक्तीने हप्ता भरणे थांबवलं तर कायद्याने तुम्हालाही त्या कर्जाची जबाबदारी घ्यावी लागते. कर्जाचा हप्ता वेळेत भरला नाही तर बँक तुम्हाला नोटीस पाठवू शकते आणि आवश्यक असल्यास कोर्टामार्फत वसुलीची कारवाई सुरू करू शकते.
अनेकांना माहित नसते की गॅरेंटर होणं तुमच्या सिबिल स्कोरवर सुद्धा थेट परिणाम करते. जर कर्जदाराने कर्ज फेडलं नाही तर गॅरेंटरचा सुद्धा क्रेडिट स्कोर कमी होतो. गॅरेंटर म्हणून सही केल्यानंतर जर मूळ कर्जदाराने हप्ते थकवले, थकबाकी वाढवली किंवा उशिरा पैसे दिले ,तर बँक तुमच्याकडून त्या कर्जाची मूळ रक्कम व्याज लेट फी आणि दंड ही वसूल करू शकते.
गॅरेंटर होणे म्हणजे केवळ एका कागदावर सही करणं नाही तर ती एक कायदेशीर जबाबदारी सुद्धा आहे. एकदा सही केली की, त्या व्यक्तीने कर्ज फेडलं नाही तर तुमच्या नावावरही बँक कारवाई करू शकते. गॅरेंटर होण्यापूर्वी खालील गोष्टी नेहमी लक्षात ठेवा संबंधित व्यक्ती आर्थिक दृष्ट्या जबाबदार आहे का ते तपासा.
कर्जाची मुदत, हप्ते, व्याजदर आणि अटी नीट वाचा. शक्यतो नातेसंबंधाचे दबावाखाली कधीच सही करू नका. बँकेकडून कर्जदाराच्या परतफेडची स्थिती वेळोवेळी जाणून घ्या. एक छोटीशी सही कधीकधी आयुष्यभराचा आर्थिक त्रास ठरू शकते. म्हणूनच कुणाच्याही विनंती वर विश्वास ठेवून गॅरेंटर म्हणून सही करण्याआधी नीट विचार करा.
नाहीतर तुमचं क्रेडिट रेकॉर्ड, मालमत्ता आणि भविष्य दोन्ही धोक्यात येऊ शकतं. मैत्री, ओळख किंवा भावनिक कारणांनी कोणासाठी गॅरेंटल होणे अत्यंत धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे सही करण्यापूर्वी एकदा विचार करा कारण चुकीच्या निर्णयाचा पश्चाताप आयुष्यभर करावा लागू शकतो.













