Gas Cylinder Price : तेल विपणन कंपन्या प्रत्येक महिन्याला गॅस सिलेंडरच्या दरात बदल करत असतात. कधी एलपीजी गॅस सिलेंडर चे रेट कमी होतात तर कधी वाढत असतात. दरम्यान नोव्हेंबर महिन्याची सुरुवात सर्वसामान्यांसाठी दिलासादायी ठरली आहे. आज गॅस सिलेंडर चे रेट कमी करण्याचा निर्णय तेल कंपन्यांनी घेतलाय.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने १ नोव्हेंबरपासून गॅस सिलेंडरचे नवीन रेट जाहीर केले आहेत. नव्या किमतीनुसार १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घट झाली आहे. पण, गेल्या काही महिन्यांपासून देशात घरगुती गॅस सिलेंडरचे रेट कायम आहेत.

या महिन्यात सुद्धा कंपन्यांनी घरगुती गॅस सिलेंडरचे रेट कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. घरगुती १४.२ किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत नोव्हेंबर महिन्यात सुद्धा कोणताचं बदल करण्यात आलेला नाही. यामुळे सर्वसामान्यांमध्ये थोडीशी नाराजगी आहे.
घरगुती गॅस सिलेंडरचे रेट कमी झाले तर याचा थेट फायदा सर्वसामान्यांना मिळतो. दरम्यान व्यावसायिक गॅस सिलेंडरचे रेट कमी झाले असल्याने हॉटेल, रेस्टॉरंट आणि लहान व्यवसायांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
अर्थात या निर्णयाचा सुद्धा सर्वसामान्यांना अप्रत्यक्षरीत्या फायदा होणार आहे. हा निर्णय हॉटेल मधील जेवण आणखी स्वस्त बनवेल. अशा परिस्थितीत आता आपण व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत किती कपात झाली आहे याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत.
किंमत किती कमी झाली?
इंडियन ऑइलच्या अधिकृत वेबसाइटनुसार, व्यवसायिक गॅस सिलेंडरची किमत पाच-सहा रुपयांनी कमी झाली आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची नवीन किंमत आता १५९०.५० रुपये आहे, जी गेल्या महिन्यापेक्षा ५ रुपयांनी कमी आहे.
ऑक्टोबरमध्ये हा दर १५९५.५० रुपये होता. याचप्रमाणे देशातील इतर महानगरांमध्येही किरकोळ कपात करण्यात आली आहे. कोलकातामध्ये व्यावसायिक सिलिंडरच्या दरात सर्वाधिक म्हणजे साडेसहा रुपयांची घट झाली आहे. आता तेथे १९ किलोचा सिलिंडर १६९४ रुपयांना उपलब्ध आहे, जो ऑक्टोबरमधील १७००.५० रुपयांच्या तुलनेत कमी आहे.
मुंबईत या सिलिंडरचा दर १५४२ रुपये असून, तोही मागील महिन्याच्या तुलनेत ५ रुपयांनी कमी आहे. तर चेन्नईत आता १९ किलोचा एलपीजी सिलिंडर १७५० रुपयांना मिळेल, जो ऑक्टोबरच्या तुलनेत साडेचार रुपयांनी स्वस्त झाला आहे.
मागील महिन्यात सरकारने व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत सुमारे १५ रुपयांची वाढ केली होती, ज्यामुळे लहान-मोठ्या खाद्य व्यवसायांवर अतिरिक्त भार पडला होता. नोव्हेंबरच्या या कपातीनंतर त्यांना थोडासा दिलासा मिळेल. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती कायम राहिल्याने सामान्य ग्राहकांना मात्र कोणताही थेट फायदा झालेला नाही.
सध्या देशातील बहुतांश ठिकाणी घरगुती १४.२ किलो एलपीजी सिलिंडरचा दर स्थिर आहे. तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत स्थैर्य आल्याने आणि घाऊक दर कमी झाल्यामुळे व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे.













