महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार वार्षिक साडेसात हजार रुपये

Published on -

Maharashtra Schools : राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून पुन्हा एकदा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शालेय शिक्षण विभागाने यावर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत महत्त्वाचा बदल केला आहे. प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत यंदा 2016 नंतर प्रथमच मोठा बदल झाला आहे.

या नव्या निर्णयानुसार यंदा चौथी आणि सातवी तसेच पाचवी आणि आठवी या चार वर्गांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. तसेच पुढील वर्षापासून फक्त चौथी आणि सातवीच्या वर्गांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाईल.

2016 च्या आधी चौथी आणि सातवी या दोन वर्गांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित केली जात असे. मात्र 2016 पासून पाचवी आणि आठवी या दोन वर्गांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन केले जाऊ लागले. मात्र यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घसरण पाहायला मिळाली.

यामुळे आता पुन्हा एकदा चौथी आणि सातवीच्या वर्गांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी या वर्षापासून होणार आहे आणि यंदा चौथी आणि सातवी सोबतच पाचवी आणि आठवीच्या वर्गांसाठी देखील शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे.

किती शिष्यवृत्ती मिळणार?

शासन निर्णयानुसार चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रती महिना 500 रुपये याप्रमाणे वार्षिक पाच हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. त्याशिवाय सातवीतील विद्यार्थ्यांसाठी प्रती महिना 750 रुपये प्रमाणे साडेसात हजार रुपये शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिष्यवृत्ती परीक्षेत पास आऊट होणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर झाल्यानंतर तीन वर्ष बॅंक खात्यात शिष्यवृत्ती जमा केली जाणार आहे.

केव्हा घेतली जाणार परीक्षा ?

या शैक्षणिक वर्षात पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी 2026 मध्ये घेतली जाणार आहे. तसेच चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा एप्रिल-मे 2026 मध्ये घेण्याचे नियाेजन करण्यात आले आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच निर्गमित झाला असून शिष्यवृत्ती परीक्षेत झालेला हा बदल विद्यार्थ्यांसाठी फायद्याचा ठरणार अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News